Wed, Mar 20, 2019 12:44होमपेज › Kolhapur › चंदगड पोलिसांची काय‘द्या’ची भाषा!

चंदगड पोलिसांची काय‘द्या’ची भाषा!

Published On: Feb 17 2018 10:02AM | Last Updated: Feb 17 2018 10:02AMचंदगड : नारायण गडकरी

गेल्या एक वर्षापासून तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. याविरोधात आता अनेक संघटना एकत्र आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत लाचलुचपत विभागाने पोलिस कार्यालयातील एका महिलेवर कारवाई केली. बुधवारी झालेल्या कारवाईने पोलिस कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने तुडये, कोलिक, पारगड, राजगोळी आणि कानूर या दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना शासकीय कामासाठी चंदगडला यावे लागते. या नागरिकांना आपल्या कामासाठी पूर्ण दिवस द्यावा लागतो, तसेच खर्चही येतो. या संधीचा गैरफायदा घेत येथील अधिकारी या सार्‍यांना नागवतात. एका सहीसाठीही उद्या या, दोन दिवसाने या, साहेब बाहेर गेले आहेत, अशी अनेक कारणे सांगून नागरिकांकडून पैशांची मागणी केली जाते. दुसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठीही खर्च तितकाच येणार असल्याने झटपट काम उरकण्यासाठी अधिकार्‍यांना टेबलाखालून पैसे द्यावे लागतात. तहसील कार्यालयाचीही परिस्थिती वेगळी नाही. प्रत्येक तलाठी कार्यालयात साधा सात-बारा किंवा रहिवासी दाखला घेण्यासाठी गेलेल्यांना पंटरांच्या हातावर वीस रुपये टेकवल्याशिवाय काम होत नाही. शासकीय काम पंटरांकरवी केले जाते. त्यामुळे या विभागाकडून नागरिकांची लूट केली जाते. निराधार, विधवा, अपंग, ज्येष्ठ नागरिक आदी शासकीय योजनांचा लाभ घेणार्‍या असहाय नागरिकांनाही सोडले जात नाही. पुरवठा विभागातही मोठा भ्रष्टाचार आहे. यामधून दरमहा लाखोंची कमाई केली जात असल्याचे उघड-उघड बोलले जाते. हॉटेल परवाना, स्वसंरक्षणार्थ वापरण्यात येणार्‍या बंदुकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशा अनेक कामांच्या माध्यमातून तहसील कार्यालयातील अधिकारी मालामाल झाले आहेत. यापूर्वी या कार्यालयातील सुनील घाग, भैरू कागणकर, तलाठी सुधीर देसाई, मंडल अधिकारी विनायक आरगे आणि आता मंडल अधिकारी सुरेश बन्‍ने व त्याचा पंटर परशराम आवडण, रूपाली खडके हे लाचलुचपत पथकाच्या हाती लागल्याने पोलिस ठाणे आणि तहसील कार्यालय चर्चेत आले आहे.