Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Kolhapur › पोलिस ठाणे जाळपोळ : १४ जण निर्दोष

पोलिस ठाणे जाळपोळ : १४ जण निर्दोष

Published On: Dec 03 2017 1:33AM | Last Updated: Dec 02 2017 11:58PM

बुकमार्क करा

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्याऐवजी दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत होती. त्यामध्ये गोरगरीब कुटुंबाचा नाहक बळी जात होता. त्यातूनच जनक्षोभाचा उद्रेक होऊन चंदगड पोलिस ठाण्याची जाळपोळ झाली. याप्रकरणी 14 जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या 14 आरोपींची जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. 

इनाम कोळिंद्रे येथील गुरुनाथ तारळेकर यांना दि. 5 फेब्रुवारी 2014 रोजी भरदिवसा चंदगड येथे अशोक गावडे व रमेश ठाकूर या दोघांनी त्यांच्या डोक्यात टोण्याने मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांचा हुबळी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. या आरोपींना चंदगड पोलिसांनी वेळेत अटक केली नाही. त्यामुळे गुरुनाथ तारळेकर यांचा मृतदेह संतप्त जमावाने दि. 8 फेब्रुवारी 2014 रोजी चंदगड पोलिस ठाण्यात आणला व आरोपींना त्वरित अटक करा, तरच मृतदेह अंत्यविधीसाठी आम्ही नेऊ, अशी पोलिसांकडे मागणी केली. 

यावेळी संतप्त झालेल्या हजारोंच्या जमावाने चंदगड पोलिस ठाण्यावर चहोबाजूने दगडफेक केली. गाड्यांची जाळपोळ केली. यामध्ये ठाण्यातील संगणक, खिडक्या, काचा, टेबल, खुर्च्या यांचे नुकसान झाले, असा आरोप चंदगड पोलिसांनी ठेवून गुन्हा नोंद केला होता. 

27 आरोपी दाखवून केवळ दिवाकर पाटील, एकनाथ म्हाडगूत, इरफान तगारे, राजेंद्र सावंत, गफार सनदी, बाळू तावडे, विलास तावडे, पंडित कांबळे, राजाराम गावडे, सुभाष पाटील, सचिन बुरूड, हिदायत मकानदार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ 14 जणांवर दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश गडहिंग्लज यांच्या कोर्टासमोर गुणदोषावर चालला. खटल्यामध्ये सरकारच्या वतीने 8 पोलिस साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. मात्र, सबळ पुराव्यांअभावी 14 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.