Fri, Jul 19, 2019 13:27होमपेज › Kolhapur › चंदगडकरांना पालकमंत्र्यांनी तिसर्‍यांदा फसविल्याचा आरोप

चंदगडकरांना पालकमंत्र्यांनी तिसर्‍यांदा फसविल्याचा आरोप

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:44AMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी चंदगड ग्रामस्थांनी शासनाने दोनवेळा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून एकीचे दर्शन घडवले. नगरपंचायतीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कसबले व चंद्रकांत दाणी हे कडक उन्हातसुद्धा पायात चप्पल न घालता अनवाणी फिरण्याची भीष्मप्रतिज्ञा करीत आहेत. चंदगड येथील प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. 28 मार्चपर्यंत नगरपंचायतीचा दर्जा देऊ असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाला त्यांनी हरताळ फासल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

अधिवेशन काळात नगरपंचायत कृती समितीने मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नगरपंचायतीचा दर्जा देऊन निवडणूक कार्यक्रम लावावा अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही अधिवेशन संपल्यानंतर कार्यवाही करण्याचे ठोस आश्‍वासन दिले होते.

शासनातील मुख्यमंत्र्यांनंतरचे दोन नंबरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना समक्ष भेटून न्याय हक्‍क देण्याची मागणी करून देखील पुन्हा ग्रामपंचायतीची निवडणूक लादल्यानंतर आता न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्‍न चंदगडवासीयांसमोर आहे. वास्तविक शासन निर्णयाप्रमाणे तालुक्यातील ठिकाणाच्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देऊन नगरपंचायतीच्या निवडणुका घेणे नैसर्गिक न्यायाचे असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला जातो व शेजारच्या चंदगड व गारगोटी तालुक्याला दर्जा न देता ग्रामपंचायत निवडणुकीचा तिसर्‍यांदा कार्यक्रम लादला जातो ही शासनाची मनमानी आहे. शासनाचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल चंदगडवासीयांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. याप्रकरणी चंदगडकर संतप्त झाले असून रविवार दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता  रवळनाथ देवालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी यांनी दिली.