Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Kolhapur › विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमीच!

विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमीच!

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:36AMउजळाईवाडी : दौलत कांबळे 

उडाण योजनेंतर्गत एप्रिलपासून एअर डेक्कनने मुंबई- कोल्हापूर विमान सेवा सुरू केली होती. ही सेवा 24 जूनपासून बंद झाली. येणार येणार म्हणत अद्याप काही विमान कोल्हापूर विमान तळावर लॅडिंग झालेले नाही. रविवार दि. 22 रोजीही विमान आले नसल्याने एअर डेक्कनच्या सेवेबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे. इंडिगो एअर लाईन्स ही कंपनी सप्टेंबर पासून मुंबई-कोल्हापूर तसेच कोल्हापूर -हैद्राबाद -तिरूपती सेवा सुरू करणार असे सूचित केले जात असल्याने तोच एक आता कोल्हापूरकरांसाठी आशेचा किरण आहे. यासाठी आता राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. 

किंग फिशरची मुंबई- कोल्हापूर विमान सेवा प्रथम धावपट्टी खराब असल्याच्या कारणावरून सन 2010 मध्ये काही काळासाठी बंद केली होती. दीड वर्षानंतर धावपट्टी दुरुस्तीनंतर सुरू झाली. पण ही विमान सेवा तीन महिनेच चालू राहिली. किंग फिशर कंपनी तोट्यात आल्याने कंपनीने विमान सेवा बंद केली. पुढे त्यानंतर गेली सहा वर्षे विमानसेवा धावपट्टी चांगली असून ही बंद राहिली. प्रथम काँग्र्र्र्रेस सरकारच्या काळात ‘क’ वर्ग विमानतळात कोल्हापूरचा समावेश करून दोनशे पस्तीस कोटींचा आराखडा भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून तयार करण्यात आला होता. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. संभाजीराजे खा. धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला नियमित विमान सेवा चालू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून दोनशे चौर्‍याहत्तर कोटींचा आराखडा मंजूर केला असून उडाण योजनेंतर्गत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. एप्रिलपासून एअर डेक्कनची कोल्हापूर - मुंबई सेवा सुरू झाली आणि सहा वर्षे खंडित झालेली विमानसेवा मंगळवार, बुधवार, रविवार अशी तीन दिवसांसाठी सुरू झाली.

 तीन दिवस का असेना विमानसेवा सुरू झाली. यात कोल्हापूरचे लोक समाधानी होते; पण एअर डेक्कन दोन अडीच महिन्यांतच सेवा अनियमित देऊ लागली आहे. 24 जूनपासून विमान आलेले नाही, पुढे येईल का याची शक्यता नाही. इंडिगो एअर लाईन्स या कंपनीकडून कोल्हापूरचा सर्व्हे केला असून कंपनी कोल्हापूर-मुंबई तसेच हैद्राबाद -तिरूपती- कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी विमानतळावर तिकीट विक्रीकरिता शेड देखील तयार करण्यात  आले आहे. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज असून 
कोल्हापूरकरांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे.