Thu, Apr 25, 2019 21:54होमपेज › Kolhapur › अपहारातील रक्‍कम वसुलीचे आव्हान

अपहारातील रक्‍कम वसुलीचे आव्हान

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शॉपीत झालेल्या अपहार प्रकरणातील संशयितांकडून दिलेले धनादेश न वटल्याने अपहारातील रक्‍कम वसुलीचे मोठे आव्हान असणार आहे. प्रसंगी संशयित अमित पवार याच्या मालमत्तेवर टाच आणून ही रक्‍कम वसूल केली जाईल, असे गोकुळच्या वतीने सांगण्यात आले.  जुन्या पुणे-बंगळूर मार्गावर हॉटेल ओपल शेजारी गोकुळची ही शॉपी आहे. या शॉपीत अमित पवार हा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. जून 2017 मध्ये या शॉपीत सुमारे 65 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे पुढे आले. गोकुळने केलेल्या चौकशीत ही रक्‍कम 63 लाख 72 हजार रुपये होती. याप्रकरणी त्याचवेळी पोलिसांत फिर्याद दिली होती.

माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी सहकार विभागामार्फत करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक जी. बी. निकाळजे यांची या चौकशीसाठी नियुक्‍ती झाली होती. त्यांनी केलेल्या चौकशीत अपहाराची ही रक्‍कम 71 लाखांवर पोहोचली. या रकमेच्या वसुलीपोटी पवार याने 29 धनादेश दिले होते; पण त्यापैकी एकही धनादेश न वटल्याने गोकुळने या प्रकरणी स्वतंत्र फिर्याद दाखल केली. या चौकशीत निकाळजे यांनी संघ व्यवस्थापनाच्या गलथान कारभारावरही ताशेरे ओढले आहेत. या शॉपीकडे संघाकडून येणार्‍या मालाची आवक न दाखवता ती कमी दाखवून बेरजेत फेरफार करून हा अपहार केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. 31 मार्च 2017 रोजी शिल्लक सर्व मालाची विक्री दाखवून अपहार केला आहे. त्याचबरोबर माल दिला एकाला पण धनादेश दुसर्‍याच व्यक्तीकडून स्विकारल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. 

संघ व्यवस्थानावर ठपका

या चौकशी अहवालात संघ व्यवस्थापनावरच ठपका ठेवण्यात आला आहे. मार्केटींग विभागाने या शॉपीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे माल असतानाही मालाची उचल झाली. तोंडी मागणीवर मालाचा पुरवठा करण्यात आला. पाठवलेल्या मालाची संगणकावर नोंद नाही, शॉपीच्या तपासणीत हयगय, वितरकांकडून सुरक्षा रक्कम घेतलेली नाही यासारखा ठपका व्यवस्थापनावर ठेवला आहे.

...प्रसंगी मालमत्तेवर टाच : घाणेकर

या शॉपीतील गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीच पोलिसांत फिर्याद दिली आहे. दिलेले धनादेश न वटल्याने त्याप्रकरणीही स्वतंत्र दावा दाखल आहे. पैसे वसूल झाले नाहीत तर संबंधितांच्या मालमत्तेवर टाच आणून ते वसूल करू, असे संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले.