Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Kolhapur › मैदानावरील हुल्लडबाजी रोखण्याचे आव्हान

मैदानावरील हुल्लडबाजी रोखण्याचे आव्हान

Published On: May 06 2018 1:08AM | Last Updated: May 05 2018 10:56PMकोल्हापूर : सागर यादव 

फुटबॉल मैदानावरील नाहक इर्ष्या, पेठा आणि तालीम संस्थांच्या नावाचा वापर करून पावसाळ्यातील छत्र्यांसारखे उगवलेले ग्रुप्स, क्लब, विचारमंच, बाईज, फ्रेंड सर्कल यांच्यातील स्पर्धा यामुळे  हुल्लडबाजी प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याचे हुल्लडबाजांचे धाडसही वाढले आहे. सोशल मीडियामुळे आगीत तेल ओतण्याचे काम सुरू आहे. यामुळे खेळाच्या मैदानातील हुल्लडबाजी रोखण्याचे आव्हान क्रीडानगरी कोल्हापूरसमोर उभे ठाकले आहे. 

शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला राजाश्रयापाठोपाठ लोकाश्रयाचे पाठबळ मिळाल्याने तो विकसित झाला. यामुळेच आज लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करणार्‍या स्पर्धा प्रतिवर्षी संपूर्ण हंगामभर सुरू असतात. एकीकडे हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे या परंपरेला काळीमा फासणारी फुटबॉल मैदानावील हुल्लडबाजी भयावह रूप घेत आहे. पेठांतील तालीम संस्था-तरुण मंडळांतील नाहक इर्ष्या प्रचंड प्रमाणात वाढत असून सोशल मीडियामुळे याला खतपाणी मिळत आहे. यावर वेळीच उपाय-योजना न झाल्यास भविष्यात ही हुल्लडबाजी हाताबाहेर जाण्याची भीती फुटबॉल शौकिनांतून व्यक्त होत आहे. 

सोशल मीडियावर अंकुश गरजेचा...

यापूर्वीही मैदानात अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. खेळातील चढाओढीतून खेळाडूंची हाणामारी, पंचांचा निर्णय मान्य नसल्याने त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार, प्रशिक्षक-व्यवस्थापक यांच्यात हमरी-तुमरी आणि समर्थकांत हाणामारी अशा घटना झाल्या आहेत. मात्र, अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून फुटबॉल मैदानातील 
इर्ष्येला विघातक स्वरूप प्राप्त होत आहे.  प्रत्येक सामन्याच्या पूर्वी आणि नंतर खेळाडूंच्या खेळाचे आवर्जुन कौतुक व्हावे. मात्र, प्रतिस्पर्धी संघाची बदनामी, खेळाडूंवर शेरेबाजी, पेठा-तालीम संस्थांना आव्हान करणार्‍या पोस्टस् कशासाठी, असा सवाल फुटबॉलप्रेमींतून व्यक्त होत आहे. आज सोशल मीडियाचा वापर चांगल्या कारणांसाठी कमीच पण हुल्लडबाजी सारख्या नको, त्या प्रकारासाठी प्रचंड प्रमाणात होत आहे. यामुळेच किरकोळ कारणांवरून दंगलीसारखे प्रकार घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असून यांचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे सोशल मीडियावर अंकुश राखावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

प्रत्येक घटक तितकाच जबाबदार...

फुटबॉल मैदानावरील हुल्लडबाजीसाठी संबंधित प्रत्येक घटक तितकाच जबाबदार आहे. फुटबॉलपटूंनी खिलाडूवृत्तीने केलेला खेळ आणि समर्थकांकडून त्याच पद्धतीची दाद गरजेची असताना नेमके याच्या उलट चित्र आहे. पंचांना देवाचा दर्जा असल्याने त्यांचा निर्णय अंतिम असतो. मात्र, फुटबॉल मैदानावर पंचांच्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप नोंदविला जात आहे. त्यांना शिव्यांची लाखोली, मारहाणीच्या प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याने पंचगिरी करायला कोणी तयार नसल्याचे वास्तव आहे. तालीम-संस्थांची परंपरा बदनाम करणार्‍या  हुल्लडबाज समर्थकांना रोखण्यासाठी त्या-त्या तालीम संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्पर्धा संयोजकांनीही हुल्लडबाजीवर नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा राबविणे अत्यावश्यक आहे. शिखर संस्था असणार्‍या केएसएची जबाबदारी सर्वात महत्त्वाची आहे. पोलिस प्रशासनाकडून अनेकदा मागणी होऊनही केएसएकडून हुल्लडबाजीचे सीसीटीव्ही फुटेज त्यांना उपलब्ध करून दिले जात नाहीत, ते देण्यात यावे, अशी मागणी फुटबॉलप्रेमींतून वारंवार होत आहे. काही तालीम मंडळ परिसरातील लोक पोलिस खात्यात संख्येने सर्वाधिक आहेत. यामुळे त्या तालमीवर कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झालेली नाही, असा आरोप इतर संघ व समर्थकांकडून केला जातो. यावर उपाय-योजना म्हणून पोलिसांनी पक्षपातीपणे कारवाई करून हुल्लडबाजी रोखावी, अशी मागणी फुटबॉलप्रेमी करत आहेत.