होमपेज › Kolhapur › शिक्षणाचे दरवाजे केव्हा उघडणार?

शिक्षणाचे दरवाजे केव्हा उघडणार?

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:26AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

राज्यात भाजप-सेना आघाडीचे सरकार असल्याने कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध उपक्रमांना कोट्यवधी रुपयांच्या निधीचा बुस्टर डोस मिळाल्याने गती मिळाली आहे. तथापि, या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षणाचे आव्हान मात्र आजही कायम आहे. हे आव्हान पेलल्यास राज्यातील सामान्य कुटुंबातील गुणवान विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शिवाय, अनेक निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने सीपीआर रुग्णालय हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून खासगी रुग्णालयांनाही स्पर्धेत मागे टाकू शकते.

महाराष्ट्रात शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी घेतल्यानंतर खासगी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे पेव जरूर फुटले; पण शासकीय वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधेची गाडी मात्र काही हालली नव्हती. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नाने कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा पाळणा हालला. हा पाळणा हलण्यापूर्वी आरोग्यमंत्री खानविलकरांना किती कळा सहन कराव्या लागल्या होत्या, याची माहिती तशी पडद्याआड आहे. नवे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे प्रस्ताव आणला, तेव्हा तो सहजासहजी मंजूर होत नव्हता.

यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना लातूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय हवे होते, तर भारिप बहुजन महासंघाचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात वैद्यकीय महाविद्यालयाचा आग्रह धरला होता. अखेरीस या तीनही महाविद्यालयांचा प्रस्ताव मंजूर करावा लागला. एका ठरावाने या महाविद्यालयांची जन्मतारीख निश्‍चित झाली; पण त्यांची शैक्षणिक वाढ होताना मात्र निकोप झाली नाही. खानविलकर मंत्रिपदाबरोबरच राजकारणातूनही पायउतार झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला वाली राहिला नाही. परिणामी, शाहू वैद्यकीय महाविद्यालय हे पदवी शिक्षणापुरतेच मर्यादित राहिले आणि लातूर व अकोल्यात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरू होऊन जमाना लोटण्याची वेळ आली. आता या दोन वैद्यकीय महाविद्यालयांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या अतिरिक्‍त जागाही मंजूर झाल्या आहेत. यामुळे कोल्हापुरातील राजकारणी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचे आव्हान कसे स्वीकारणार? यावर त्यांची राजकीय कसोटी ठरणार आहे.

राज्यामध्ये एकूण 25 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यातील 23 वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या 1490 जागा उपलब्ध होत्या. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नुकतेच राज्यात 12 वैद्यकीय महाविद्यालयांना 74 नव्या जागा उपलब्ध करून दिल्याने आता ही संख्या 1564 वर गेली आहे. मात्र, यामध्ये राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news, medical college, Master degree, Challenge,