शेतकर्‍यांचा बाजार समितीत चक्‍काजाम

Last Updated: Nov 19 2019 1:28AM
Responsive image


कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीत सोमवारी पहाटेपासून गूळ उत्पादक आपल्या वाहनातून सौद्यासाठी गूळ घेऊन आले होते. नियमाप्रमाणे सकाळी सौदे सुरू न झाल्यामुळे गूळ उत्पादकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त गूळ उत्पादकांनी बाजार समितीच्या दोन्ही गेटवर आपली गुळाची वाहने आडवी लावून चार तास चक्‍काजाम आंदोलन केले. यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली.

बाजार समितीत हमालांना यावर्षीची हमालीमधील वाढ मिळालेली नाही. ही मागणी त्यांनी गत सोमवारी केली होती. त्याबाबत आयोजित बैठकीत हमाल-व्यापारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर काम बंद आंदोलन हमालांनी केले. बुधवारी पुन्हा सौदे सुरू झाले. व्यापारी प्रतिनिधींनी यावर्षीची दरवाढ देतो, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे हमाल त्या आशेवर होते. शनिवारी हमाली वाढीबाबतचे पत्र मिळत नाही म्हटल्यावर हमालांनी सौदे निघाल्यानंतर खरेदीदारांचे भरणी व पॅकिंगचे काम करणार नसल्याचे सांगत व्यापार्‍यांच्या दुकानातील हमालीचे काम दुसर्‍यांनाही करू दिले नाही.

याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत  समितीत संचालक, व्यापारी, हमाल यांच्यात चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होते. मात्र तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे व्यापार्‍यांनी सोमवारी सौद्यात सहभाग घेतला नाही. पहाटेपासून गुळाची वाहने सौद्यासाठी समितीत दाखल होताच गूळ उत्पादकांना सकाळी दहा वाजता सौद्यांना प्रारंभ होईल, असे समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. दहा वाजून गेले तरीही सौदे निघालेले नाहीत म्हटल्यावर संतप्त गूळ उत्पादकांनी आपली सर्व वाहने गेटसमोर नेत आत-बाहेर होणारी सर्व वाहतूक रोखली. त्यामुळे समितीत शेकडो वाहने, खरेदीदार अडकून राहीले.

अकराच्या सुमारास व्यापारी प्रतिनिधींची शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनमध्ये बैठक सुरू झाली. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड दाखल झाले. त्यांनी समितीत बैठक बोलावत सर्व घटकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकर्‍यांचे यंदा हाल झाले आहेत. त्याचा विचार करण्याची दोन्ही घटकांना विनंती केली तसेच समन्वय साधण्याचा प्रयत्नही केला. त्यालाही दाद दिली नाही. यावेळी हमालांचे प्रतिनिधी बाबूराव खोत यांच्याकडे व्यापारी प्रतिनिधींनी आता दहा टक्के वाढ दिली तर पुढील दोन वर्षे मागणार नाही, अशा पुनर्कराराची मागणी केली. त्याला खोत यांनी नकार दिला.

त्यामुळे जादा पोलिस बंदोबस्त मागवत कारवाईचा इशारा दिला. यावेळी शेतकरी, हमाल-व्यापारी, संचालक यांच्यात मोठी वादावादी झाली. बाजार समिती प्रशासनाला, संचालकांना आम्ही फास लावून घ्यायचा का तेवढे सांगा, असा संतप्त सवाल शेतकरी बाबासो पाटील यांनी केला. त्यानंतर भगवान काटे यांनी बाहेर जाऊन सर्व वाहने गूळ उत्पादकांना सोडण्यास सांगितले. त्यानंतर गूळ उत्पादकांनी गेटवरील वाहने आणून समितीच्या दारात लावली.

आडमुठेपणामुळे बाजारपेठ वेठीस

गेले काही दिवस सुरू असलेल्या हमाल-व्यापारी यांच्यातील वादामागे या दोन्ही घटकांचा आडमुठेपणा आहे. हमाल व  गूळ व्यापारी यांच्यात 2015 साली झालेल्या करारानुसार दरवर्षी हमालांना 10 टक्के मजुरीत वाढ देण्याचे निश्‍चित आहे. मात्र यावर्षी व्यापार्‍यांनी ही दरवाढ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हमालांनी वारंवार याबाबत विचारणा केली. मात्र व्यापारी प्रतिनिधींनी आज वाढीचे पत्र देतो, उद्या देतो, अशा आशेवर हमालांना ठेवले. शनिवारी मात्र हमालांनी व्यापार्‍यांचे काम बंद केले. हे दोन्ही घटक आपल्या भूमिकावर ठाम राहिले. सौदे बंद करून बाजारपेठ वेठीस धरली.

समितीची बोटचेपी भूमिका

याबाबतच्या समितीमध्ये आयोजित बैठकीदरम्यान व्यापारी प्रतिनिधींना संचालक उदय पाटील व नेताजी पाटील यांनी आज सौद्यात भरण्यासाठी हमाल नाही म्हटलात तर आम्ही स्वत: भरून देतो. मात्र आज सौदे काढा, अशी विनंती केली. त्यालाही व्यापारी प्रतिनिधींनी दाद दिली नाही. याबाबत जो घटक सौदे बंद पाडतो, त्या व्यापारी किंवा हमालांचे लायसन्स रद्द करण्याचा समितीला अधिकार आहे. दर हंगामात मध्यंतरी सौदे बंद पाडण्याचे प्रकार काही अपप्रवृत्तीकडून जाणीवपूर्वक होतात. समितीमधील बैठकीत यामधील काही प्रवृती सरळमार्गावरील चर्चेला खो घालत असतात. मात्र त्याबाबत कारवाईचा बडगा उगारताना समितीची बोटचेपी भूमिका कायमच राहते.