Fri, Jul 19, 2019 14:21होमपेज › Kolhapur › चक्काजाम आंदोलन; वाहनांमधील सोडली हवा 

चक्काजाम आंदोलन; वाहनांमधील सोडली हवा 

Published On: Jul 28 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 11:36PMकोल्हापूर :  प्रतिनिधी

 चक्काजाम आंदोलनाची झळ आता सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. रेशनिंग दुकानांमध्ये धान्य अजूनही पोहोचले नसल्याने पुढील महिन्यासाठी या दुकानांमध्ये मालाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उजळाईवाडी महामार्गावरून मालाची वाहतूक करणारी वाहने अडवून 40 हून अधिक ट्रकच्या चाकांमधील हवा सोडण्यात आली. विविध मागण्यांसाठी देशव्यापी चक्काजाम आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच होते. परराज्यातून येणार्‍या मालाची आवक थांबल्याने घाऊक व्यापार्‍यांकडील मालही आता संपत आला आहे.  किरकोळ व्यापार्‍यांकडील माल संपल्यानंतर  विविध जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कांदा-बटाटा मार्केटमधील उलाढाल ठप्प झाली आहे. कांदा व बटाट्याची आवक पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे उपलब्ध मालाची चढ्या दराने विक्री होत आहे. 

कोल्हापूरातील गुळ, साखर गोडावून मध्ये ठेवण्यात आली  असून पावसात याचा साठा करण्यामध्ये व्यापारी वर्गाला अडचणी निर्माण होत आहेत. 

दरम्यान ग्रेन मर्चंन्ट असोसिएशनने चक्का जाम आंदोलनाला पाठींबा दिला आहे. शनिवारी शहरातील धान्य व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठींबा दर्शवणार आहेत.    उळाईवाडी महामार्गावरून मालाची वाहतूक करणारे ट्रक कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असेासिएशनच्या कार्यकर्त्यांनी आडवले. चक्का जाम आंदोलन सुरु असताना वाहतूक करणार्‍या या ट्रक,जीप च्या  चाकातील हवा सोडण्यात आली. काही सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रक मधील चालक व क्लीनर्सना जेवण देत आहेत. श्री गुरुदत्त ट्रान्सपोर्टच्यावतीने संदीप गवळी यांनी मार्केट यार्ड येथे परराज्यातील ट्रकचालकांना जेवण दिले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील  रेशनिंग दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याला लॉरी ऑपरेटर असोसिएशन विरोध केल्याने रेशन दुकानात मालाची पोलिस बंदोबस्तात वाहतूक करण्याचा निर्णय  प्रशसानाने घेतला आहे. पण ही वाहने चालवण्यास कोणीही ड्रायव्हर जाणार नाही असे सुभाष जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात 1574  रेशन दुकाने आहेत. या दुकानांमध्ये 31 जुलै पर्यंत आवश्यक वस्तूंचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. या बंदमुळे जिल्ह्यातील आठशे कोटींची  उलाढाल ठप्प झाली आहे.