Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Kolhapur › साखरेचा वापर होणार्‍या पदार्थांवर सेस लावा

साखरेचा वापर होणार्‍या पदार्थांवर सेस लावा

Published On: Apr 24 2018 1:27AM | Last Updated: Apr 24 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उत्पादित होणार्‍या 60 ते 65 टक्के साखरेचा वापर शीतपेये, मिठाई सारख्या पदार्थांसाठी होतो, साखरेचे दर कमी झाले तरी या पदार्थांचे दर कधी कमी होत नाहीत. यामुळे साखरेचा वापर होणार्‍या पदार्थांवर सेस लावावा, त्यातून जमा होणारी रक्कम साखर कारखान्यांना द्यावी आणि ती रक्कम ऊस उत्पादकांसाठीच वापरावी, अशी सूचना केंद्र शासनाला केल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ऊस उत्पादकांना ही दोन वर्षे काळजीची आहेत, त्यामुळे केंद्र शासनाने मार्ग काढला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.पवार म्हणाले, ऊस उत्पादकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्र दिले आहे. त्यावर मोदी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीची आज दिल्लीत बैठक होत आहे. गरजेेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाल्याने हा प्रश्‍न निर्माण झाल्याचे सांगत ते म्हणाले, जास्त उत्पादनामुळे भाव कमी आला. यामुळे साखर निर्यात झाली पाहिजे, पण त्याचा खर्च परवडत नाही. यामुळे निर्यातीचा वाहतूक खर्च राज्य व केंद्र शासनाने करावा, उत्पादकांचे पैसे देण्यासाठी सर्वच कारखाने साखर विक्री करतात आणि दर कमी होतो.

त्यासाठी साखरेचा बफर स्टॉकसाठी सरकारने मदत करावी, अनेक कारखाने इथेनॉल बनवतात ते पेट्रोलियम कंपन्या वापरतात. पेट्रोलचा भाव वाढतो, पण इथेनॉलचा भाव वाढवून देत नाहीत, तो भाव वाढवला पाहिजे, अशा सूचना साखर उद्योगासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष गडकरी यांना केल्या आहेत. असे सागंत आघाडी सरकारच्या काळात आपण साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी हे निर्णय घेतले होते, असेही पवार यांनी सांगितले.सर्वच क्षेत्रात मंदी आहे, उत्पादक अडचणीत आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. निर्यात कमी झाली आहे, विकासासाठी गुंतवणूक कमी होत आहे, असे पवार यांनी सांगितले.

Tags : Kolhapur, Cess, sugar, substances, used