Thu, Apr 25, 2019 06:16होमपेज › Kolhapur › तालुकास्तरावर दिव्यांगांना प्रमाणपत्रे

तालुकास्तरावर दिव्यांगांना प्रमाणपत्रे

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 14 2018 11:48PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दिव्यांग उन्‍नती अभियानातील सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकावार कँपचे नियोजन करण्याचे आजच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. बैठकीस आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यात पहिला कँप ऑगस्ट महिन्याच्या शेवटी घेण्यात येणार आहे. 

दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी शिबिर आयोजित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. मात्र, सीपीआर  प्रशासनाने त्याला असमर्थता दर्शविली होती. त्यामुळे ही गोष्ट जिल्हा परिषद सदस्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी यासंदर्भात संबंंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून संयुक्‍त बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज ही बैठक शासकीय विश्रामधाम येथे झाली.

या बैठकीत तालुक्याच्या ठिकाणी अपंगत्वाचे दाखले देण्यात येणार्‍या अडचणींची माहिती डॉ. केम्पी पाटील यांनी दिली. यावर चर्चा करताना श्री. इंगवले म्हणाले,  आपण कँप आयोजित केला आणि त्यात लगेच दिव्यांगांना प्रमाणपत्र दिले असे होणार नाही. त्यांची तपासणी करावी लागणार याची जाणिव आहे, पण कँपमध्ये किमान प्रमाणपत्रास पात्र असणार्‍या दिव्यांगांची संख्या तरी निश्‍चित करता येईल. सर्वांनाचा सीपीआरमध्ये बोलविणे योग्य होणार नाही. त्याचा खर्चही त्यांना परवडणार नाही. जर दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी सीपीआरला यावे लागणार असेल तर या अभियानाचा काय उपयोग? अखेर तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी कँप घेण्याचे ठरले. त्याचे तालुकावर नियोजन करण्यात येणार आहे.

22 हजार 948  दिव्यांगांची नोंद 

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिव्यांग उन्‍नती अभियान हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला. या अभियानात दिव्यांगांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे. त्यानुसार 

पहिल्या टप्प्यात दिव्यांगांचे 

सर्वेक्षण करण्यात आले. यात 22 हजार 948  दिव्यांगांची नोंद झाली. त्यामध्ये 16 वर्षांखालील दिव्यांगांची संख्या 10 हजार 458 इतकी तर 16 ते 25  वयोगटातील दिव्यांगांची संख्या 5 हजार 174 इतकी आढळून आली.  42 हजार 984 दिव्यांगांपैकी 17 हजार 413 दिव्यांगांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे. राहिलेल्या 25 हजार 571 दिव्यांगांकडे प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले.