Wed, May 22, 2019 10:57होमपेज › Kolhapur › बेलबागेत सेंट्रिंग साहित्याला आग टेम्पोसह दोन मोटारींचेही नुकसान

बेलबागेत सेंट्रिंग साहित्याला आग टेम्पोसह दोन मोटारींचेही नुकसान

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:51PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरात सेंट्रिंग साहित्य शनिवारी मध्यरात्री पेटले. आगीच्या उग्ररूपाने बाजूच्या दोन मोटारी, अ‍ॅपे रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत रवींद्र वसंतराव खिरूगडे यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बेलबागेतील स्वयंवर मंगल कार्यालयाशेजारी रिकामी जागा आहे. या ठिकाणी खिरूगडे यांनी सेंट्रिंगचे साहित्य ठेवले होते. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास साहित्याला आग लागली. फळ्या, बांबू, प्लायवूड याला आग लागून ज्वाळा सर्वत्र पसरल्या. शेजारी पार्क केलेली अभिजित पाटील, संजय खिरूगडे यांच्या मोटारींचे डॅशबोर्ड, वायरिंग, डिकी जळून खाक झाली. तर गणेश सावंत यांच्या अ‍ॅपे रिक्षाचे टायर, हेडलाईट, सिट जळाले.

याची वर्दी मिळताच लक्ष्मीपुरी, टिंबर मार्केट, कावळा नाका फायर स्टेशनचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मद्यपींचा उपद्रव

या परिसरातील रिकाम्या जागेत रात्री मद्यपींची रेलचेल असते. काही उपद्रवी रात्री उशिरापर्यंत येथे थांबून असतात. यातील काहींनी फेकलेल्या सिगारेटमुळे आग लागल्याचा संशय स्थानिकांनी वर्तवला. तसेच मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणीही रहिवाशांनी पोलिसांकडे केली.