होमपेज › Kolhapur › पंचगंगेला प्रदूषणाचा ओव्हरडोस

पंचगंगेला प्रदूषणाचा ओव्हरडोस

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 12:59AMकोल्हापूर : विजय पाटील  

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार पंचगंगा नदीचा समावेश देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये होतो. मागील पंचवीस वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणमुक्‍त व्हावी म्हणून सर्व स्तरांवर व्यापक लोकचळवळ सुरू आहे; पण उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही प्रशासनातील जबाबदार घटक निर्ढावल्यासारखे ढिम्म आहेत. लाखो लोकांची तहान भागवणार्‍या आणि कोल्हापूर समृद्ध करणार्‍या पंचगंगेला प्रदूषित केले आहे. त्यामुळेच अनेक आजारांची लागण होत आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या भूमिकेने पंचगंगेचे दुखणे जास्तच वाढू लागले आहे. पंचगंगेच्या एकूणच प्रदूषणाबद्दलचा ‘ऑन दी स्पॉट’ आढावा... 

पाणी म्हणजे जीवन आणि नदी म्हणजे माय असे म्हटले जाते, हे खरे आहे. पण, पंचगंगेगा नदीची ही ओळख प्रशासकीय निर्ढावलेपणाने पार पुसून टाकली आहे. मागील पंचवीस वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणमुक्‍तीसाठी लोकांचा लढा सुरू आहे. या लढ्याला कायदेशीर आयाम देण्यासाठी 1997 साली ज्येष्ठ नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली. जनहित याचिकेवर न्यायालयाने प्रदूषणमुक्‍तीसाठी आदेश दिले; पण महापालिका, जिल्हा परिषद, प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी जबाबदार यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे पंचगंगेच्या भाळावर महाप्रदूषणाचा शिक्‍का दिवसेंदिवस अधिकच घट्ट झाला आहे. दुधाळी आणि जयंती नाल्यातील सांडपाणी आजही दिवसरात्र थेट नदीत मिसळत आहे. 

कोल्हापूरपासून प्रयाग चिखली गावाचे रस्त्यावरून अंतर फक्‍त पाच किलोमीटर इतके आहे. या ठिकाणी पाच नद्यांच्या संगम झाल्याने  नदीच्या या प्रवाहाला पंचगंगा म्हणून ओळखले जाते. पश्‍चिमेकडून कुंभी, भोगावती, तुळसी तसेच उत्तरेकडून कासारी असा हा प्रवाह आहे. यासह गुप्त नदी म्हणून सरस्वती नदीचा प्रवाह मानला जातो. प्रयागावर नदीच्या डोहातील पाणी कुणीही ओंजळीतून पिऊ शकतो. तुलनेने हे पाणी स्वच्छ आहे; पण जसजसा नदीचा प्रवाह शहराकडे वाहत येतो तसतसे मैलामिश्रित, कचरामिश्रित सांडपाणी नदीच्या पोटात शिरत जाते. 

दुधाळी, जयंती हे मुख्य नाले नदीत मिसळत नाहीत, असे प्रशासनाने अनेक वेळा लेखी लिहून दिले आहे. तसेच इतर नाल्यांवरील सांडपाणी पंपिंग करून सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्राकडे पाठवले जात असल्याचा आभाससुद्धा निर्माण केला जातोय; पण वास्तव मात्र तसे नाही. कारण, शहर व उपनगरांतील सांडपाण्याचे ओझे घेऊन वाहणारे नाले दररोज दिवसरात्र थेट नदीत मिसळतात. या नाल्यांनी पंचगंगेला नुसते दूषितच नव्हे, तर विषारी बनवलेय. 

दुधाळी नाल्यातून वाहणारे सांडपाणी हे मैलामिश्रित आणि कचरामिश्रित आहे. नदीचा एखादा छोटा प्रवाह असेल इतक्या वेगाने या नाल्यातील पाणी नदीत मिसळते. पंचगंगा घाटावर असणार्‍या शेवटच्या मंदिराच्या पाठीमागील शेतवडीतून वाट काढत गेलो तर दुधाळीचा हा वाहणारा नाला दिसतो. जयंती नाल्यातून मिसळणारे पाणी हे गंभीर आजार निर्माण करणारे वैद्यकीय कचरामिश्रित आणि प्लास्टिकमिश्रित आहे.  

जयंती पुलावरून पाहिले की नाला कोरडा दिसतो. एक थेंबही सांडपाणी नदीत मिसळू दिले जात नसल्याचे वरवर दिसते; पण प्रत्यक्षात निकम मळा परिसरापासून पुढे सीपीआरमधील शस्त्रक्रिया केलेले आणि मैलामिश्रित पाणी, तसेच शहरातील सांडपाणी  जयंती नाल्यातून नदीला भिडते. या नाल्यातील पाण्यावर शेकडो टन प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, वापरलेल्या सुया, इंजेक्शनचा थर साचलेला असतो.

 दुधाळी आणि जयंती हे दोन मोठे नाले पंचगंगेचे पाणी विषारी करण्यास पुरेसे आहेत. कारण, ज्या ठिकाणी हे दोन्ही नाले पंचगंगेत मिसळतात, त्या ठिकाणी शेकडो मासे मृत अवस्थेत तरंगत असल्याचे चित्र नित्याचे आहे. पंचगंगेचे हे पाणी साहजिकच पिण्यासाठीच काय सांडपाणी म्हणून घरात वापरणेही धोकादायक आहे.   
 

tags : Kolhapur,news, Central, Pollution, Control, Board, Report, Panchganga, river, polluted,