Fri, Apr 19, 2019 12:39होमपेज › Kolhapur › क्रीडानगरीला वैभवशाली शतकोत्तर परंपरा 

क्रीडानगरीला वैभवशाली शतकोत्तर परंपरा 

Published On: Aug 28 2018 1:15AM | Last Updated: Aug 27 2018 11:25PMकोल्हापूर : सागर यादव 

पारंपरिक कुस्ती खेळापासून ते आंतरराष्ट्रीय अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्पर्यंतच्या प्रत्येक क्रीडा प्रकारात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारी शतकोत्तर क्रीडा परंपरा ‘शाहूनगरी’ कोल्हापूरने निर्माण केली आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंच्या राजाश्रयाने आणि त्यानंतर लोकाश्रयाने कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचा पाया मजबूत केला. मात्र, स्वतंत्र भारतात या क्रीडा परंपरेच्या विकासासाठी आवश्यक खत पाणी मिळू शकले नाही. पण तरीही कोल्हापूरचे खेळाडू जिद्द-कष्ट-चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके मिळवून महाराष्ट्र आणि देशाच्या नावलौकीकात भर घालत आहेत. 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडादिन त्यानिमित्ताने...

पेठापेठांत रुजली तालीम परंपरा...
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’, या ध्येय उद्देशाने प्रजाहितदक्ष राजवट राबवत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरचा सर्वांगिण विकास साधला. इतर सर्व क्षेत्राप्रमाणेच भावी पिढी सक्षम-निर्व्यसनी राहावी या उद्देशाने क्रीडा परंपरा विकसित केली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खासबाग कुस्ती मैदान उभे करण्याबरोबरच मोतीबाग, गंगावेश, शाहूपुरी, काळाईमाम, बाराईमाम, नंगीवली, सणगर-बोडके, तटाकडील, पाटाकडील अशी तालीम परंपरा पेठापेठांत रुजविली. या तालमीमध्ये अनेक नामवंत मल्ल घडले. हिंदकेसरी, रुस्तूम-ए-हिंद, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रकुलसह स्पर्धा गाजविणारे मल्ल येथे निर्माण झाले. रणरागिणी ताराराणी यांचा वारसा जपत महिला कुस्तीगिरांनीही पुरुषी वर्चस्व असणार्‍या तांबड्या मातीतील या खेळात आपला झेंडा रोवला. 

खेळांमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न मार्गी...
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात कुस्ती बरोबरच फुटबॉलसारखा परदेशी रांगडा खेळ कोल्हापुरात रुजला. अनावश्यक तळी मुजवून मैदाने तयार करण्यात आली. छत्रपती शहाजी महाराजांनी कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) ही क्रीडा संघटक संस्था काढून खेळ विकासासाठी सुरू केलेले कार्य आज तागायत अविरत सुरू आहे.  एकट्या फुटबॉल खेळात आज  शेकडो संघ, हजारो खेळाडू निर्माण झाले आहेत. ‘केएसए’तर्फे  छत्रपती शाहू स्टेडियमसारखी मैदाने स्वबळावर उभारण्यात आली आहेत. आज फुटबॉल हंगामावर लाखो रुपये खर्च होत आहेत. कोल्हापुरात खेळल्या जाणार्‍या विविध खेळांमुळे त्यावर आधारित विविध गोष्टींचे अनेक व्यवसाय-उद्योग विकसित झाले आहेत. यामुळे क्रीडाक्षेत्रामुळे अनेक कुटुंबीयांच्या उदरनिर्वाह प्रश्‍न मार्गी लागला आहे.   

प्रत्येक खेळात कोल्हापूरकर आघाडीवर...
कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, नेमबाजी, जलतरण, हॉकी, बुद्धिबळ, कबड्डी कोणताही वैयक्‍तिक व सांघिक संघ असो कोल्हापूरकर आघाडीवर आहेत. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत पदक मिळविण्याची क्षमता असणारे खेळाडू कोल्हापूरनेच देशाला दिले आहेत, आजही देत आहेत. अ‍ॅथेलेटिक्स, टेबल टेनिस, शिवकालीन युद्धकला, स्केटिंग, सायकलिंग, ज्युदो-कराटे-वुशू-कीक बॉक्सिंग, मल्लखांब, घुडसवारी, नौकानयन अशा प्रत्येक खेळात कोल्हापूरचे खेळाडू यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना, दिवस-रात्र कष्ट करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर इथले खेळाडू कोल्हापूरचे व महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावत आहेत.

अधुनिक खेळातही दबदबा...
कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना अत्याधुनिक रेसिंग खेळातील मोटोक्रॉस, गो-कार्टिंग, गिर्यारोहण, सायकलिंग, ट्रायथलॉन,  यॉटिंग अशा खेळांतही  कोल्हापूरने नावलौकीक कमवला आहे. खडतर अशा आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने दबदबा निर्माण केला आहे.

देशातील एकमेव क्रीडा कीर्ती स्तंभ...
खेळाचे मैदान गाजवूण देशाचे नाव सर्वदूर पोहोचविणार्‍या क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणी भविष्यातही जोपासल्या जाव्यात या उद्देशाने कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांनी देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रीडा किर्ती स्तंभ उभारला. जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या नगारखाण्याच्या देखण्या वास्तू समोर बांधण्यात आलेला हा क्रीडा किर्ती स्तंभ क्रीडा क्षेत्राचा देदिप्यमान इतिहास अभिमानाने सांगत आजही उभा आहे.  खेळाडूंच्या कार्यकर्तृत्वाच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू घडावेत हा त्यामागचा हेतू होता. 29 डिसेंबर 1955 या दिवशी या स्तंभाचा पायाभरणी समारंभ झाला. उदघाटन 13 फेब्रुवारी 1960 रोजी झाले. महाराजाधिराज ऑफ पतियाळा लेफ्टनंट जनरल हिज हायनेस सर यादविंद्रसिंह यांच्या उपस्थितीत झाले. स्तंभाच्या वरच्या भागावर कोल्हापूरच्या रांगड्या कुस्ती परंपरेचे प्रतीक असणार्‍या पैलवानाचे शिल्प असून त्याखालील स्तंभावर संगमरवरी कोनशिलेवर आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणार्‍या खेळाडूंची नावे कोरली आहेत. कोल्हापूरचे वैभव म्हणून या स्तंभाचे जतन गरजेचे आहे.