होमपेज › Kolhapur › छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार...

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:26PMसंयुक्‍त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवरायांच्या विचारांचा जागर 


‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा अखंड जयजयकार. शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके. पारंपरिक वाद्यांचा गजर अशा चैतन्यमयी वातावरणात संयुक्‍त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांच्या विचारांचा जागर करीत अभिवादन करण्यात आले. 

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर भगवे ध्वज, पताकांनी अवघे शहर सजले आहे. मंगळवारी (दि.17) संयुक्‍त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. सांयकाळी पाच वाजता लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. उत्तरेश्‍वर मर्दानी आखाड्याच्या सदस्यांनी युद्ध कलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीतील रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. भगवे ध्वज, फेटे परिधान केेलेल्या शिवप्रेमींनी शिवरायांच्या नावाचा अखंड जयघोष करीत परिसर दणाणून सोडला. सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावरही लेझर लाईट शो व स्फूर्ती गीतांवर तरुणाईने जल्लोष केला. गंगावेश, रंकाळा स्टँड, तटाकडील तालीम, ताराबाई रोड, महालक्ष्मी मंदिर, पापाची तिकटी, जोशी गल्ली कॉर्नर, तेली गल्लीमार्गे उत्तरेश्‍वर पेठ येथे रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीसाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

डॉल्बीचे साहित्य जप्त

संयुक्‍त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीत चार बेस व चार टॉप असलेला डॉल्बी लावण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना समजताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना समजावून डॉब्लीवरील बेस व टॉप काढण्यास सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी विरोध केला. मात्र, पोलिस निरीक्षकांनी सर्व साहित्य जप्‍त करण्याचा खाक्या दाखविला. त्यानंतर केवळ दोन साऊंड बॉक्स ठेवण्यात आले.  

राजारामपुरी उत्सव समितीतर्फे मिरवणूक

हातात भगवे ध्वज, तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेषातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पारंपरिक वाद्यांचा गजर ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जल्‍लोषी आणि शिवमय वातावरणात मंगळवारी सायंकाळी राजारामपुरीत शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ झाला. विविध मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. विविध फलकांतून प्रबोधनासह शहरातील प्रलंबित प्रश्‍नांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम झाले. संयुक्‍त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. 

सायबर चौकात आयोजित कार्यक्रमात शाहू महाराज, महापौर  स्वाती यवलुजे, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. संजय मंडलिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महापालिका विरोधी पक्षनेता विलास वास्कर, ऋतुराज पाटील, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, उत्सव समितीचे अध्यक्ष संजय काटकर आदींसह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मेघडंबरीत छत्रपती शिवरायांची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती.  बग्गीमध्ये माँ जिजाऊ आणि बालशिवाजी असा सजीव देखावा साकारला होता. वीस घोड्यांवरून छत्रपती शिवराय, मावळे, आणि माँ जिजाऊ यांच्या वेषातील बालचमूंनी मिरवणुकीत लक्ष वेधले. करवीर गर्जना ढोल ताल पथकातील कलाकारांनी आपल्या कलाअदाकारीने उपस्थितांना मिरवणूक मार्गावर खिळवून ठेवले. 

लेझीम पथक, झांजपथकांसह पारंपरिक वाद्यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही ताल धरायला लावले. बैलगाड्यांवर प्रबोधन फलक लावून शहरातील समस्यांची मांडणी करण्यात आली.  मिरवणुकीत सहभागी ट्रेलरवर मल्‍लखांबाची प्रात्यक्षिके पाहताना उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकत होता. तर युवक-युवतींनी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित सजीव देखावा पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक मार्गावर एलईडी स्क्रीनद्वारे मिरवणुकीचे प्रक्षेपण सुरू होते. सायबर चौक, आईचा पुतळा, नार्वेकर भाजी मार्केट शाळा नंबर 9, श्रीराम विद्यालय पोपटराव जगदाळे हॉल, राजाराम गार्डन, जनता बाजार मेन रोडमार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचा समारोप  मारुती मंदिराजवळ करण्यात आला. 

 

Tags : kolhapur, kolhapur news, Shiv Jayanti, Celebrating,