आजरा : सचिन कळेकर
आजरा तालुक्यातील डोंगर परिसरात लावल्या जाणार्या आगीमुळे सध्या पाहावे तिकडे धुराचे लोट व भयानक आगीचे दर्शन घडत आहे. वणवे लावण्याच्या वाढत्या प्रकारामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही ठिकाणी काजू, आंबा, फणस यासह रानमेवा आगीच्या भक्षस्थानी पडत आहे.
आजरा तालुका हा डोंगराळ व दुर्गम असून या ठिकाणच्या परिसरातील डोंगरामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींसह वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ससा, कोल्हा, मोर, साळींदर, कवडा, रानडुक्कर, रानमांजर, गवारेडे, हत्ती यासह विविध प्रकारचे सर्प डोंगर रांगातून आढळून येतात. सध्या वातावरणात नेहमीच बदल होत असून, याचा परिणाम पिकांवरही होत आहे. फेब्रुवारी महिन्यात वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण कमी होऊन उष्माचे प्रमाण वाढत जाते. याच कालावधीत ठिकठिकाणच्या डोंगर परिसराला वणवा लावण्याचे प्रकार सुरू होतात. प्रतिवर्षाप्रमाणे चालूवर्षीही आजरा तालुक्याच्या परिसरातील जंगलांना वणवे लावले जात असल्यामुळे पाहावे तिकडे धुराचे लोट व भयानक आगीचे दर्शन घडत आहे.
सध्या जंगलांना वणवे लावण्याचे प्रकार वाढले असून, डोंगररांगांना संध्याकाळच्या वेळी ज्वाळांनी वेढलेल्या दिसत आहेत. हे वणवे कित्येक मैलापर्यंतच्या डोंगरांना वेढत आहेत. उग्र रूप धारण केलेल्या आगीला विझविणे अवघड जात आहे. ही आग शेतासह जंगलात घुसून काजू, आंबा, फणस, जंगलातील वनौषधी, विविध प्रकारच्या वृक्षांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोहाळे व मडिलगेदरम्यान असलेला डोंगर आगीमध्ये धुमसत आहे.
जंगलाला लागलेल्या आगीमुळे बिथरलेले वन्यप्राणी सैरावैरा होऊन शेतीसह नागरी वस्तीकडे येत आहेत. पैशाचे पीक म्हणून ओळखल्या जाणार्या काजू पिकालाही या आगीची मोठी झळ बसत असून, आगीमुळे शेतकर्यांचे दैनंदिन हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. आगीमुळे निसर्गाला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाची साखळीच धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात शेतातील पालापाचोळ्याला आग लावताना शेतकर्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भरदुपारी आग न लावता सायंकाळच्या दरम्यान आग लावणे तसेच आग आजूबाजूला पसरू नये, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
जंगलातील अनमोल वृक्ष व वनौषधींचे योग्य प्रकारे काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जंगलामध्ये लावलेली आग त्वरित विझवून निसर्गाचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. वनहद्दीत लावल्या जाणार्या वणव्यांमध्ये कोट्यवधींची वनसंपत्ती जळून खाक होत आहे. आग आटोक्यात आणण्याबरोबरच आग लावणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. वणवा लागू नये यासाठी आग लावणार्यांचा शोध घेणे व भविष्यात आगी लागू नयेत यासाठीही उपाययोजना राबवणे महत्त्वाचे आहे.