होमपेज › Kolhapur › धुक्याने काजू मोहर करपला

धुक्याने काजू मोहर करपला

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:38AM

बुकमार्क करा
चंदगड : नारायण गडकरी 

पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या काजू पिकावर बदलत्या हवामानामुळे विपरीत परिणाम झाला आहे. संसाराला हातभार लावणार्‍या या महत्त्वाच्या पिकावर पहाटे पडणार्‍या दाट धुक्याने घेरले आहे. काजू मोहर आणि कच्ची फळे गळून पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना कसा करावा, या विवंचनेत शेतकरी पडला आहे. 

बदलत्या हवामानामुळे आणि पहाटे पडणार्‍या धुक्यामुळे बहरलेला काजू मोहर जळून गेला आहे. निसर्गाच्या या कोपामुळे काजू उत्पादक हवालदिल झाला आहे. उसावर पडणार्‍या मावा रोगाने आता काजूला लक्ष्य केले आहे. हा मावा काजू पिकावर मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसते. शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकर्‍यांना परस्पर नुकसानभरपाई दिली जाणार आहे. काजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या सात जिल्ह्यांतील अधिसूचित महसूल मंडळात सध्या राबवण्यात येत आहे. संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 76 हजार रुपये योजना विमा कंपनीमार्फत काजू फळ पिकांसाठी महसूल मंडळ पातळीवरील कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा काजू उत्पादक शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन चंदगड तालुका कृषी विभागाने केले आहे.