Thu, Feb 21, 2019 09:06होमपेज › Kolhapur › जिल्हा बँकेत रोकड टंचाई

जिल्हा बँकेत रोकड टंचाई

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 1:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दररोज सरासरी 15 कोटी रुपयांची रोकड लागते. प्रत्यक्षात तीन कोटी रुपयांच्या आसपास रोकड उपलब्ध होत आहे. यामुळे बँकेच्या शाखांमधून रोकड टंचाई जाणवत आहे. ही टंचाई तात्पुरती असून, लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी पत्रकात म्हटले आहे.

गेले आठ ते दहा दिवस चलन तुटवडा आहे. रोकडीची मागणी आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, रत्नाकर बँक या करन्सी चेस्ट बँकांकडे केली जाते. फक्‍त आयसीआयसीआय बँकेकडून जिल्हा बँकेला 10 ते 15 टक्के रोकड उपलब्ध होते. ही रोकड  सर्व शाखांना पुरवली जाते. खातेदार  शेतकर्‍यांचे ऊस बिल, दूध बिल, पतसंस्था, नोकरदारांचे पगार, संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांचे लाभार्थी आपल्या खात्यातून पैसे काढतात. बँकेला या खातेदारांना रोकडचा पुरवठा करावाच लागतो. खरीप हंगामासाठी कर्जवाटप सुरू आहे. त्यामुळे विकास संस्थांच्या सभासदांकडून रोकड मागणी होत आहे;  रोकड नसल्याने शाखांमधून रोकड टंचाई जाणवू लागली आहे. यासाठी करन्सी चेस्टना रोकड उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. खातेदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी बँक स्वखर्चाने मुंबई, ठाण्यातून रोकड आणत आहे. ग्राहकांना टंचाई भासणार नाही, यासाठी प्रयत्न असून, खातेदारांनीही सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

Tags : Kolhapur, Cash, shortage,  district, bank