Mon, Mar 25, 2019 17:33होमपेज › Kolhapur › कारची धडक; महिला ठार, एक जखमी

कारची धडक; महिला ठार, एक जखमी

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्‍वर मंदिरानजीक ह्युंडाई कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत महिला ठार झाली. अलका रामदास गवळी (वय 42, रा. सुभाषनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर भारती आनंदराव काईंगडे (वय 60, रा. शिंगणापूर) जखमी झाल्या. रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अलका गवळी, भारती काईंगडे या दोघी नर्स असून अनुसया चिले या आया आहेत. या तिघी डॉ. किरण दोशी यांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. रात्री आठच्या सुमारास काम आटोपून केएमटी बस स्टॉपकडे त्या येत होत्या. वटेश्‍वर मंदिरापासून काही अंतर पुढे आल्या असता, पाठीमागून भरधाव आलेल्या ह्युंडाई कारने (एमएच 09 सीएम 1600) अलका गवळी व भारती काईंगडे यांना धडक दिली. अलका गवळी रस्त्यावर कोसळल्याने कार त्यांच्या दोन्ही पायांवरून गेली.

तर भारती काईंगडे यांच्या डोक्याला दुखापत झाली. कारचालक महिला असल्याचे घटनास्थळी असलेल्या लोकांकडून सांगण्यात आले. घटनास्थळी झालेल्या गर्दीतून ती महिला निघून गेल्याचे लोकांकडून सांगण्यात आले. कारवर घाटगे ग्रुपचा सिम्बॉल आहे. जखमींना नागरिकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच अलका गवळी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर भारती काईंगडे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने उपचार सुरू होते. त्यांना रात्री उशिरा खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

हलाखीची परिस्थिती

अलका गवळी यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिघेही काम करत. त्यांचा मुलगा चप्पल दुकानात कामाला जातो. तर मुलगीही खासगी नोकरीस आहे. मुलीच्या लग्‍नासाठी पैसे जमवावे म्हणून अलका गवळी गेली पाच वर्षे दवाखान्यात काम करत होत्या. त्यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच सुभाषनगरातील तरुणांनी व गवळी यांच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती. जखमी काईंगडे यांच्या नातेवाईकांनीही दवाखान्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत सीपीआरमध्ये नातेवाईक थांबून होते.