Thu, Apr 25, 2019 07:32होमपेज › Kolhapur › कार-ट्रॅक्टर धडक : दोन ठार

कार-ट्रॅक्टर धडक : दोन ठार

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 1:44AMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी-चिकोडी मार्गावर कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
संभाजी आत्माराम आवटे (वय 25, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल)  व संग्राम धनाजी नागराळे (20, रा. शाहूनगर, कागल) अशी मृतांची नावे आहेत. संभाजी आवटे यांचा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे खत विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानिमित्त ते निपाणीला आले होते. खत वाहतुकीसाठी त्यांनी धनाजी नागराळे यांचा ट्रक भाड्याने घेतला होता.

कमालकाचा मुलगा संग्राम याच्यासमेवत संभाजी निपाणीहून कागलकडे निघाले होते. त्यांची कार चिकोडी मार्गावर जनावर बाजारच्या गेटसमोर आली असता निपाणीहून ऊस खाली करून नाईग्लजकडे निघालेल्या ट्रॅक्टरशी त्यांची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, ट्रॅक्टरचे पुढील चाक तुटून दोन्ही वाहने रस्त्याकडेला कोसळली.

स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत पोलिसांना माहिती दिली, तसेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनास्थळी उपअधीक्षक दयानंद पवार, सीपीआय किशोर भरणी, फौजदार बी. वाय. बेटगेरी, हवालदार एस. एम. सनदी यांनी भेट दिली. अडकून पडलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. शिवलिंग सत्याप्पा खोत हा ट्रॅक्टरचालकही जखमी आहे.

आवटे यांनी खत वाहतुकीसाठी कागल येथील धनाजी नागराळे यांचा ट्रक भाड्याने घेतला होता. नागराळे हे हमीदवाडा कारखान्यावर ऊस उतरून  मुलगा संग्रामला ट्रकमधून खडकलाट येथील खतनिर्मिती कारखान्याकडे घेऊन गेले होते. तर आवटे हे आपल्या कारमधून खतासाठी लागणारे बारदान घेऊन खडकलाटला पोहोचले होते. संभाजी यांनी ट्रकमालकाला बारदान दिले व ते परत कागलला निघाले असता, धनाजी यांनी मुलगा संग्रामला संभाजी यांच्या कारमधून कागलला जाण्यास सांगितले. तसेच आपण स्वतः खत घेऊन येतो, असा निरोप दिला. त्यानुसार ते दोघे कागलकडे निघाले होते.

अपघाताची माहिती मिळताच धनाजी यांच्यासह कागलचे नगरसेवक आनंदा पसारे, माजी नगरसेवक युवराज पसारे, तानाजी पसारे, राजू जकाते, संदीप पसारे यांच्यासह संभाजी व संग्रामच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांचे विच्छेदन झाल्यांनतर ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा दोघांवरही कागल व पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संग्रामचे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते. तो वडिलांच्या कामात मदत करत होता. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. तर मृत संभाजी यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरा ट्रॅक्टरचालक खोत याने बसवेश्‍वर चौक पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक बी. वाय. बेटगेरी तपास करीत आहेत.