Wed, May 22, 2019 14:59होमपेज › Kolhapur › सक्षम उमेदवार देणार; पण कोण?

सक्षम उमेदवार देणार; पण कोण?

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 11:05PMकोल्हापूर : रणधीर पाटील

शिवसेनेने आजपर्यंत हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, त्यासाठी कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, तर कधी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना तिकीट दिले. त्यांच्यामागे ताकद उभी केली; पण ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आता पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते खा. गजानन कीर्तिकर यांनी खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेना सक्षम उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे; पण तो सक्षम उमेदवार कोण? असा प्रश्‍न खुद्द शिवसेना पक्षनेतृत्वाला अनेक वर्षांपासून पडला आहे. त्याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. 

सांगली येथे झालेल्या मेळाव्यात खा. कीर्तिकर यांनी, खा. राजू शेट्टी सुरुवातीला आमच्याकडे आले. त्यामुळे आम्ही उमेदवार उभा केला नाही. त्यानंतर ते भाजपच्या वळचणीला गेले. आता ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. त्यामुळे आम्ही आता त्यांच्या हातकणंगले मतदारसंघातून विरोधात सक्षम उमेदवार उभा करणार आहे, असे  जाहीर केले असले, तरी खा. शेट्टींना सक्षम पर्याय शिवसेनेकडे आहे काय? असा प्रश्‍न ज्यावेळी उपस्थित होतो, त्यावेळी त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येते. 

‘आयात’ उमेदवारावरच मदार
 

पूर्वीचा इचलकरंजी आणि सध्याच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला नेहमीच आयात उमेदवारावर अवलंबून राहावे लागते. या मतदारसंघातून आतापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता लोकसभा निवडणूक लढवू शकलेला नाही. कारण, आतापर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांना तशी ताकद देण्याचा प्रयत्नच झाला नाही. त्यामुळेच निवेदिता माने, डॉ. संजय पाटील, रघुनाथदादा पाटील अशा आयत्यावेळच्या नेत्यांच्या गळ्यात शिवसेना नेतृत्वाला उमेदवारीची माळ घालावी लागली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला, शिवसेनेला एकदाही ही लोकसभेची जागा जिंकता आलेली नाही. 
 

शिवसेनेसमोरील पर्याय असे...
 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पक्षाचाच उमेदवार उभा करायचा निर्णय झाल्यास सेनेसमोर आ. उल्हास पाटील, आ. सुजित मिणचेकर आणि आ. सत्यजित पाटील-सरूडकर हे तीन पर्याय आहेत; पण या तिघांचाही स्वत:चा विधानसभा मतदारसंघ वगळता व्यापक जनसंपर्क नाही. लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत पोहोचणे वरील तिघांनाही शक्य होईल, असे सध्यातरी दिसत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या तिघांपैकी लोकसभा लढविण्यास कोण तयार होईल, याची शक्यता अत्यंत धुसर आहे.  

शिवसेनेकडे एकगठ्ठा मतदान; पण...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे सुमारे दीड लाख एकगठ्ठा मतदान आहे; पण एवढी मते उमेदवाराला लोकसभा निवडणूक जिंकण्यास पुरेशी नाहीत. त्यासाठी उमेदवारही तितकाच सक्षम असणे गरजेचे आहे. जो स्व:च्या बळावर दीड ते दोन लाख मते खेचू शकेल; पण सध्या तरी शिवसेनाच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप अशा कुठल्याच विरोधी पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळेच खा. कीर्तिकर म्हटल्याप्रमाणे ते खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात कुठला सक्षम उमेदवार देणार आहेत, हे पाहावे लागेल.

Tags : Kolhapur, Capable, candidate, who