होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोन परिसराचा लेआऊट रद्द करा

शालिनी सिनेटोन परिसराचा लेआऊट रद्द करा

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या ऐतिहासिक शालिनी सिनेटोन परिसरात बांधकामासाठी परवानगी दिली हीच पहिली चूक झाली. तरीही ले-आऊट मंजूर करताना घातलेल्या अटी व शर्थींचा भंग झाला आहे. त्यामुळे विकसकाने दिलेल्या हमीपत्रानुसार सिनेटोन परिसराचा ले-आऊट आजच्या आज रद्द करावा, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी गुरुवारी महासभेत केली. भूपाल शेटे यांनी याप्रकरणी नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते. 

गैरफायदा घेऊन निवासी क्षेत्र
प्रा. पाटील म्हणाले, कोल्हापूर शहराच्या पहिल्या विकास आराखड्यात शालिनी सिनेटोन परिसरात एकूण 46 एकर जागा मराठी चित्रपट निर्मितीसाठी आरक्षित ठेवली होती. स्टुडिओचा वापर लक्षात घेता दुसर्‍या विकास आराखड्यात त्याचा वाणिज्य वापरासाठी आरक्षित झाली. विकास नियमावलींतर्गत वाणिज्य वापरात असलेली जागा निवासी म्हणून वापरता येईल, अशी नवीन दुरुस्ती आल्यामुळे या संधीचा फायदा घेत संपूर्ण जागाच निवासी क्षेत्रात करण्यात आली. त्यामुळे बांधकामाला परवानगी दिल्याने चूक झाली. ले-आऊट मंजूर करताना विकसकाला अटी व शर्थी घालण्यात आल्या होत्या. शंभर रुपयांच्या हमीपत्रावर 2004 ला परवानगी दिली. त्यावेळी शालिनी सिनेटोन असा स्टेटस होता. 2009 ला जुलैमध्ये प्रचंड पाऊस सुरू असताना सिनेटोन पाडला. 

आरक्षण असताना पुन्हा प्रस्ताव का?
महापालिकेच्या जुन्या व सध्याच्या कायद्यानुसार ओपन स्पेस-अ‍ॅमिनिटीमध्ये बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यामुळे महापालिकेत ठराव झालाकिंवा नाही झाला तरी जागा सिनेटोनसाठीच आरक्षित राहणार आहे. संबंधित भूखंडावर शालिनी सिनेटोन असे आरक्षण असताना प्रशासनाने पुन्हा आरक्षणाचा विषय सभेपुढे का आणला? रिकाम्या जागेला हेरिटेज म्हणता येते का? त्यामुळे विकसकाचा ले-आऊट नामंजूर करून रद्द करावा. हमीपत्राच्या आधारे प्रशासनाने संपूर्ण जागा ताब्यात घ्यावी, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले. 

शेटे म्हणाले, ले-आऊट मंजूर झाल्यानंतर वास्तविक संबंधित वटमुखत्यार घेतलेल्या चांगदेव घुमरे यांची तेथे सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी होती. परंतु, अधिकार्‍यांनी महापालिकेच्या निधीतून पाईपलाईनसह इतर सुविधा केल्या आहेत. विकसकाने झोपडपट्टीही विस्थापित केलेली नाही. अटी व शर्थींचा भंग होऊनही अधिकार्‍यांनी कोणतीच कारवाई केली नाही. शालिनी सिनेटोन पाडल्याने वटमुखत्यारवर गुन्हा का दाखल केला नाही. नगरसेवकांनी फेरप्रस्तावासाठी निवेदन दिल्यानंतरही खोत अजूनही गप्प का आहेत. त्यामुळे यात धनंजय खोत हे दोषी ठरतात. 
धनंजय खोत यांनी कोल्हापूरची वाट लावली

नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी कोल्हापूर शहराची वाट लावल्याचा आरोप करून ते म्हणाले, शालिनी सिनेटोन जागेप्रकरणी राज्य शासन व न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, खोत यांनी जागेचे मूळ मालक तुकोजीराव पवार हे मयत झाले असल्याचे त्यांना कळविलेले नाही. खोत यांचे वटमुखत्यार घुमरे यांच्याशी संगनमत असल्यानेच त्यांनी राज्य शासन व न्यायालयास ही माहिती दिलेली नाही. कारण मूळ मालक मयत झाल्याने ते वटमुखत्यार संपुष्टात आले असून घुमरे यांना आता कायदेशीर कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत. महाराष्ट्र सदनापेक्षा घुमरे यांच्या या ले-आऊटमध्ये मोठा घोटाळा आहे. खोत यांनी ही जागा वटमुखत्यारकडे जाण्यासाठीच प्रयत्न केल्याचा आरोपही शेटे यांनी केला. अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, अश्‍विनी बारामते, सुरेखा शहा यांनीही चर्चेत भाग घेतला. 

लाईट... अ‍ॅक्शन... कॅमेरा... पुन्हा घुमू दे 
शालिनी सिनेटोनची जागा बळकाविण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले असल्याचे सांगून सभागृहाने त्यांचा हा डाव हाणून पाडावा. प्रशासनाने संबंधित जागेवर आरक्षण टाकून जागा ताब्यात घ्यावी, अशी सूचना किरण नकाते यांनी केली. त्यानंतर शूटिंगपूर्वी वापरले जाणारे लाकडी टॅप त्यांनी सभागृहात आणून सुपारी बंद... असे म्हणत आता सिनेटोनमध्ये लाईट... अ‍ॅक्शन... कॅमेरा... हे शब्द पुन्हा घुमू देत, असे नकाते यांनी सांगितले. 

छत्रपतींच्या वारसांनी जमिनी विकू नयेत : प्रा. पाटील
प्रा. जयंत पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आमचे दैवत आहेत. शाहूंच्या वारसांनाही आम्ही त्यांच्यासारखाच मान-आदर देतो. परंतु, आता छत्रपतींच्या रक्ताच्या वारसांनीही कोणत्या जमिनी विकायच्या हे ठरविले पाहिजे. छत्रपतींच्या नातेवाइकांनी त्यांच्या जमिनी विकल्यानेच आता प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. त्यामुळे छत्रपतींच्या वारसांनी अशा वास्तू किंवा जमिनी विकू नयेत, असेही प्रा.  पाटील यांनी सांगितले.