Wed, Nov 14, 2018 02:27होमपेज › Kolhapur › वॉलमार्ट, फिल्पकार्ट करार रद्द करा 

वॉलमार्ट, फिल्पकार्ट करार रद्द करा 

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

फिल्पकार्ट ही ऑनलाईन व्यवसाय करणारी कंपनी असून वॉलमार्ट या जगातील मोठ्या कंपनीद्वारे खरेदी केली आहे. यामुळे देशातील किरकोळ व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे  यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की,  केंद्र सरकारच्या परकीय धोरणांना बगल देऊन  वॉलमार्टने भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भारतातील कापड उद्योग, दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किरणा मालासह अन्य सर्व क्षेत्रांतील किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. भारतातील बेकारी वाढून स्थानिक उत्पादक अडचणीत येणार आहेत.

त्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी देशभरात किरकोळ व्यापार्‍यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या कराराला कोल्हापुरातील व्यापारी व उद्योजकांचा तीव्र विरोध आहे.  या कराराला विरोध करण्यासाठी कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अधिवेशन 23 जुलैला दिल्ली येथे होत आहे. यामध्ये करारावर चर्चा होणार असून हा करार रद्द करावा यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 

यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, प्रशांत शिंदे संजय शेटे, जयेश ओसवाल, प्रदीपभाई कापडिया, बबन महाजन, राहुल नष्टे, धैर्यशील पाटील, मंगेश लिंग्रस, दीपक शहा  व्यापारी व उद्योजक उपस्थित होते.