Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Kolhapur › दूध अन् ऊस उत्पादन दोन्हीही घाट्यातच!

दूध अन् ऊस उत्पादन दोन्हीही घाट्यातच!

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:19AMकुडित्रे : प्रतिनिधी

पशुखाद्य, वैरण, व्याज, औषधोपचार व मजुरी यांचे वाढलेले दर आणि ‘गोकुळ’ने घटवलेला गायीचा दूध दर आणि उसाचा वाढलेला उत्पादन खर्च, यामुळे दूध आणि शेती दोन्हीही व्यवसाय न परवडणारे झाले आहेत. 

उसाला कारखान्याकडून व दुधाला संघांकडून मिळणारा दर विचारात घेतला, तर गाय-म्हैस पाळण्यापेक्षा व ऊस लावण्यापेक्षा साखर कारखान्याकडे ऊसतोडपी  म्हणून काम केल्यालं परवडतं, अशी प्रतिक्रिया हताश शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहेत. संघाने पशुखाद्याचे दर 2012 मध्ये दोनदा वाढवले. त्यावेळी 500 रुपयाला मिळणारं गोळीचं पोतं आठशे रुपये केलं. आता ते 955 रुपयाला झालंय. 600 ते 650 रुपयाला मिळणारा भुस्सा 870 रुपयांवर गेला आहे. जी गत दुधाची तीच उसाची. कर्नाटकच्या साखर कारखान्यांच्या संघटनेने अभ्यास करून उसाचा उत्पादन खर्च प्रतिटन 1,900 रुपये काढला आहे. 

उसाची एफ.आर.पी. आहे प्रतिटन 2,550 रुपये. म्हणजे वाढीव उतार्‍यासह सरासरी प्रतिटन 2,730 रुपये. म्हणजे शेतकर्‍याला प्रतिटन 800 ते 830 रुपये मिळतात. यात न दिसणारा खर्च, त्याची व त्याच्या कुटुंबीयांची मजुरी धरलेली नाही. हे 800 रुपये त्याला मिळतात तेही अठरा महिन्यांनी... तुकड्या तुकड्यांनी.

तोडप्यांना दिवसाला, तर शेतकर्‍याला 18 महिन्यांनी...

उसाचा तोडणीचा दर प्रतिटन 228 रुपये. त्यावर 18 टक्के कमिशन मिळून प्रतिटन 270 रुपये 18 पैसे झाला आहे. एक गडी दिवसाला 2 टन ऊस सोलून तयार करतो. म्हणजे चार तासात सुमारे 540 रुपये मजुरी पडते. ऊस उत्पादकाला 18 महिने राबून टनाला तेवढी मिळत नाही. गड्याला खेपेमागे वाड्याचे 200 रुपये मिळतात. म्हणूनच कारखान्यावर हंगामात वाड्याचे स्टॉल विकसित होत आहेत.