Sun, Aug 25, 2019 04:27होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे बांधकाम करता येईल का?

पर्यायी पुलाचे बांधकाम करता येईल का?

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 23 2018 11:59PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे रखडलेले बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पूर्ण करता येईल का, अशी विचारणा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालकाकडे केली आहे. शिवाजी पूल अवजड वाहनांसाठी धोकादायकच असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पर्यायी पुलाच्या बांधकामाबाबत पुन्हा एकदा मार्गदर्शन मागवले आहे. याबाबतचे पत्र शुक्रवारी देण्यात आले.

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर 26 जानेवारीला भीषण अपघात झाला होता. यानंतर या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. त्याबाबत देण्यात आलेल्या अहवालात हा पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे रखडलेले बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यातर्गंत पूर्ण करता येईल का, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे.

पर्यायी पुलाचे निम्म्याहून अधिक बांधकाम झाले आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या कायद्यामुळे हे बांधकाम पूर्णत्वास गेलेले नाही. अर्धवट बांधकाम पूर्ण व्हावे याकरिता पुरातत्त्व विभागाच्या कायद्यात सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत या विधेयकावर अद्याप शिक्‍कामोर्तब झालेले नाही. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत या पर्यायी पुलाचे काम पूर्ण करा, अशी मागणी सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हाधिकार्‍यांकडे यापूर्वी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालकाकडे दोन वेळा मार्गदर्शन मागवले होते.

यापूर्वी दोन वेळा पत्र दिले होते, त्याबाबत काहीच प्रतिसाद आला नसल्याने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना स्मरणपत्रही देण्यात आले होते. यानंतर पर्यायी पुलाचे बांधकाम आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पूर्ण करता येईल का, याबाबत मार्गदर्शन मागवणारे पत्र आज पुन्हा दिले असल्याचे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगितले.शिवाजी पूल अवजड वाहनासाठी धोकादायक आहे. यामुळे त्यावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंदच ठेवली आहे. ती भविष्यातही बंदच राहील असे स्पष्ट करत एस.टी., के.एम.टी.बससह हलक्या वाहनांचा पुलावर वेग कमी असावा याबाबत गतिरोधक बसवण्याचा विचार आहे. त्यासह अन्य काही उपाययोजना राबविता येतील का, याबाबतही संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही सुभेदार यांनी सांगितले.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Can an alternative bridge be constructed, Panchganga River