Tue, Jun 02, 2020 19:22होमपेज › Kolhapur › एलबीटीसाठी ८ पासून कॅम्प

एलबीटीसाठी ८ पासून कॅम्प

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 12:18AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील व्यापार्‍यांच्या स्थानिक संस्था करासाठी (एलबीटी) सोमवारपासून (8 ते 15 जानेवारी) महापालिकेच्या वतीने कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी मार्केटमधील महापालिकेच्या स्थानिक संस्था कर कार्यालयात कॅम्प भरेल. व्यापार्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एलबीटी अधिकारी सुनील बिद्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक संस्था कर अभय योजनेतील भाग घेतलेल्या व्यापार्‍यांचे कर निर्धारण मार्च 2018 अखेर पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार अभय योजनेत सहभागी बहुतांश व्यापार्‍यांचे कर निर्धारण पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यापार्‍यांचे कर निर्धारण असोसिएशननिहाय पूर्ण करण्याच्या नियोजनातून विविध असोसिएशनला पत्राने कळविण्यात आले आहे. बहुतांश असोसिएशनकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

त्यानुसार आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी 15 जानेवारी 2018 अखेर अभय योजनेत समाविष्ट व्यापार्‍यांची सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअंतर्गत व्यापार्‍यांकडून कागदपत्रे स्वीकारणे, त्यांचे म्हणणे व तक्रारी ऐकून घेण्याकरिता कॅम्प आयोजित केला आहे. नियमातील तरतुदीनुसार व्यापार्‍यांना संधी म्हणून यापूर्वी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.

याबाबत विहीत मुदतीनंतरही कागदपत्रे न आल्यास एकतर्फी निर्णय घेऊन कर निर्धारण पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या व्यापार्‍यांनी अद्याप कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांनी आपली कागदपत्रे या कॅम्पमध्ये देऊन कर निर्धारण पूर्ण करून कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही बिद्रे यांनी पत्रकात केले आहे.