Fri, May 24, 2019 09:02होमपेज › Kolhapur › आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे

Published On: Aug 26 2018 1:39AM | Last Updated: Aug 26 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मंगळवारी (दि. 28) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा निर्णय जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी घेतला. शासकीय विश्रामगृहावर शनिवारी दुपारी सकल मराठा समाज आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही सर्वांचीच आग्रही भूमिका आहे, त्यासाठी जे करायला लागेल ते करू, अशी ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली. विशेष अधिवेशनाचा निर्णय झाला, तर येत्या दि. 4 सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात येणार्‍या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, असे सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. मात्र, राज्य सरकार टिकणारे आरक्षण कसे देणार आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी आंदोलकांची आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला खा. राजू शेट्टी, आ. सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, संध्यादेवी कुपेकर, सत्यजित पाटील-सरूडकर, डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, प्रकाश आबिटकर व सतेज पाटील उपस्थित होते.
खा. शेट्टी म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन, शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, विशेष अधिवेशन घेण्यासाठी त्यांच्यावर दबाब आणू. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर व्यापक मोर्चा काढावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

आ. हसन मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षणाला प्रारंभीपासूनच पाठिंबा आहे. व्यापक शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे योग्य ठरेल. यानंतरही चार सप्टेंबरचे आंदोलन करावे लागले, तर जी जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडली जाईल. आ. सतेज पाटील म्हणाले, राज्याचे हिवाळी अधिवेशन 17 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी विशेष अधिवेशन झाले पाहिजे. त्यादृष्टीने सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित मुख्यमंत्र्यांची भेट घेणे योग्य होईल.
आ. सत्यजित पाटील म्हणाले, विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय 31 ऑगस्टपूर्वी घ्यावा, अशी मागणी आहे. मात्र, ही डेडलाईन वाढवण्याची विनंती आहे. आ. क्षीरसागर म्हणाले, विशेष अधिवेशनाबाबत शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे; पण आता सर्वपक्षीय म्हणून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणू. 

आ. चंद्रदीप नरके म्हणाले, अशाच प्रकारची बैठक सर्व जिल्ह्यांत घ्यावी, ‘सकल मराठा’च्या तेथील संयोजकांनी त्यांच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना एकत्र करावे आणि येत्या मंगळवारी (दि. 28) मंत्रिमंडळ बैठक आहे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. यावेळी विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करू. आ. संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, विशेष अधिवेशन घेण्यास आणि आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू. आ. मिणचेकर म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाकडे आपणही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात म्हणणे सादर केले. राज्यातील सर्वच आमदार, खासदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याची गरज आहे. आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, सरकारवर दबाव आणल्याखेरीज निर्णय होणार नाही.

आ. सुरेश हाळवणकर म्हणाले, शाहूंच्या नगरीत सुरू असलेले हे आंदोलन राज्याला दिशा देणारे आहे. सर्व जण एकत्र येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना, आरक्षण देणे तुमच्या हातात आहे हे पटवून देऊ, ही सर्व आमची जबाबदारी आहे. विशेष अधिवेशनाबाबत निर्णय झाला, तर मात्र आंदोलन स्थगित करावे, अशी विनंतीही त्यांनी केली. 

आ. अमल महाडिक यांनी या आंदोलनात आम्ही सर्व जण बरोबर असल्याची ग्वाही दिली. परदेशी गेलेल्या खा. संभाजीराजे यांच्या वतीने फत्तेसिंह सावंत यांनी भूमिका मांडत या आंदोलनात सर्व कुटुंबीय मराठा समाजाबरोबर असल्याचे सांगितले.

यानंतर मराठा आरक्षणप्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, मंगळवार दि.28 रोजी भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. या भेटीदरम्यान जो निर्णय होईल, त्यावर पुढील आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, असे सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट केले.

यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, स्वप्निल पार्टे, चंद्रकांत पाटील, हर्षल सुर्वे यांनीही भूमिका स्पष्ट केली. या बैठकीला नगरसेवक सत्यजित कदम, सचिन तोडकर, शंकरराव शेळके, चंद्रकांत बराले, किशोर घाडगे, अवधूत पाटील, राजू सावंत, प्रताप वरूटे-नाईक आदींसह आंदोलक उपस्थित होते.