Sun, Feb 23, 2020 16:18होमपेज › Kolhapur › पूरबाधित गुर्‍हाळघरांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : चंद्रकांत पाटील

पूरबाधित गुर्‍हाळघरांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : चंद्रकांत पाटील

Published On: Aug 22 2019 1:49AM | Last Updated: Aug 22 2019 1:49AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

चिखली (ता. करवीर) येथील पूरग्रस्तांना सोनतळी येथे देण्यात आलेल्या प्लॉटवर घरे बांधून देण्याबरोबरच पूरबाधित 35 गुर्‍हाळघरांच्या नुकसानीबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

पुरामुळे चिखली येथे झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री पाटील यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत आ. चंद्रदीप नरके, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी, रघुनाथ पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी चिखली येथील पूरग्रस्तांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.

पाटील पुढे म्हणाले, चिखली येथे 35 गुर्‍हाळघरे असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासनस्तरावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे एक हेक्टरपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये सरळ कर्ज आणि खावटी कर्जही माफ करण्याची शेतकर्‍यांची मागणी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडली जाईल आणि यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. चिखली गावाला वारंवार पुराचा धोका उद्भवत असून त्यांना 1989 च्या पुराप्रसंगी सोनतळी येथे प्लॉट देण्यात आले आहेत. हे सर्व प्लॉट संबंधितांच्या नावावर करून देण्याबरोबरच त्यांना घरबांधणीसाठी अडीच लाख रुपयांची मदत दिली जाईल.

चार महिने चिखलीकरांनी जनावरांसह स्थलांतर करावे

घरांच्या उभारणीसाठी पैसा कमी पडणार नाही; मात्र सोनतळी येथे घरांची उभारणी केल्यानंतर गावकर्‍यांनी पावसाळ्याचे 4 महिने आपल्या गुरासह तेथे स्थलांतरित होणे आवश्यक आहे. याबाबत गावकर्‍यांनी एकत्र येऊन चर्चा करून सर्वानुमते सोनतळी येथे घरांच्या उभारणीबाबत निर्णय घ्यावा.  याकामी आमदार चंद्रदीप नरके यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

पूरबाधित गुर्‍हाळघरांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

शासनाच्या मदतीपासून एकही पूरग्रस्त वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री पाटील म्हणाले, पुरामुळे घर पडले असेल तर नवीन घर उभे राहीपर्यंत एक वर्षाच्या कालावधीसाठी दरमहा 2 हजार प्रमाणे 24 हजार रुपये पूरग्रस्तांना उपलब्ध करून दिले जातील. तर ग्रामीण भागातील पडलेल्या घरांच्या उभारणीसाठी अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूरग्रस्तांना शासकीय कागदपत्रे महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत देण्यात येत असून ज्यांचे गॅस सिलिंडर वाहून गेले असतील त्यांना नवीन कनेक्शन देण्याबरोबरच 10 हजार शेगड्या लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या 300 जणांची टीम शेगडी दुरुस्तीसाठी कार्यरत आहे. यावेळी रघुनाथ पाटील, एस. आर. पाटील यांनीही मनोगत व्यक्‍त केले.