Tue, Mar 19, 2019 03:10होमपेज › Kolhapur › सीपीआरचा झाला ‘कचरा’

सीपीआरचा झाला ‘कचरा’

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 18 2018 11:57PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कचर्‍याचा उठाव करणार्‍या ‘नेचर अ‍ॅड नीड’ या खासगी  कंपनीचे बिल गेले दहा महिने थकले आहे. त्यामुळे कंपनी कचरा उठाव करण्यास टाळाटाळ करत आहे. परिणामी रुग्णालयात व परिसरात कचर्‍याचे ढीग साचले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सीपीआरचा सांडपाणी प्रकल्पच बंद आहे. रुग्णालयातील मैलामिश्रीत व शस्त्रक्रियेवेळी वापरून दूषित झालेले पाणीही थेट पंचगंगा नदीपात्रात मिसळत आहे. 

सीपीआरमध्ये किमान बाराशे ते पंधराशे रुग्ण उपचारासाठी दररोज येतात. गेल्या दोन वर्षांपासून या रुग्णालयातील डॉक्टर यांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटविला आहे.लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या धडपडीमुळे सीटीस्कॅन, सुसज्ज ट्रॉमा केअर, हृदय आणि नवजात बालक विभाग बनला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर व परिसरातील दानशूर व्यक्तींनी सीपीआरला भेट स्वरूपात विविध उपकरणे दिल्याने प्रशासनाचा भार हलका झाला आहे. अत्यावश्यक असणारे एमआरआय यंत्रासाठी सीपीआरचा पाठपुरावा सुरू आहे. 

तज्ज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णालयाचा दर्जा उंचावत असून रुग्णांचा विश्‍वासदेखील दृढ झाला आहे. पण, नियमित कचरा उठावाचे काम दिले आहे, ती कंपनी कचरा उचलून झूम प्रकल्पाजवळील उपलब्ध करून दिलेल्या स्वतंत्र जागेत विल्हेवाट लावतात. पण, या कामाची बिलेच कंपनीला मिळाली नसल्याने कचरा उठावाचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे सीपीआरच्या परिसरात पिशव्यांच्या थप्पी साचलेल्या आहे. कचर्‍याचा उठाव न झाल्याने सुका कचरा चक्क सीपीआर आवारातच पेटवण्यात आला. 

सांडपाणी प्रकल्पदेखील बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रुग्णालयातील हजारो लिटर मैलामिश्रीत व विविध शस्त्रक्रियेदरम्यान वापरलेले पाणी प्रक्रियेअभावी थेट पंचगाग नदीपात्र मिसळते आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.सीपीआर रुग्णालयास वेळेत शासनाकडून पतपुरवठा होत नसल्याने अशी दुर्दैवी वेळ येत आहे. कचरा उठावाचा ठेका नेचर अ‍ॅड नीड या खासगी कंपनीकडे असून त्यांची दहा महिन्यांची बिले थकीत होती. ती संबंधित कंपनीकडे वर्ग केली आहेत, तर रुग्णालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या कन्सल्टंट कंपनीची बिले लवकरच दिली जाणार आहेत. त्यामुळे बंद असणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र लवकरच चालू होईल.

डॉ. शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर