Fri, Apr 26, 2019 19:39होमपेज › Kolhapur › सीपीआरची सेवा ‘महागली’

सीपीआरची सेवा ‘महागली’

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:16AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील औषधोपचारासाठी आणि तपासणीसाठी आकारण्यात येणार्‍या सेवाशुल्कात दुपटीने वाढ केली आहे. रुग्णसेवेचे दर सुधारित करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच काढला आहे. या नव्या अध्यादेशामुळे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेचे दर दुपटीने वाढले असून त्याची अंमलबजावणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तातडीने सुरू केली आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांत तीव्र नाराजी आहे. 

नोंदणी शुल्क 10 रुपयांवरून 20 रुपये झाले आहे. तर आंतररुग्णांसाठी प्रतिदिन 20 रुपयांदेवजी 30 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागात दिवसाला 200 रुपये आकारणी केली जात होती. ती आता 400 रुपये झाली आहे. रक्तघटक चाचणीसाठीचे दर जवळजवळ दुपटीने वाढविण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ओरोनटी सिटी स्कॅनसाठी आता 1100 रुपये मोजावे लागणार आहेत. व्होल बॉडी सिटी स्कॅनसाठी 800 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. एमआरआय तपासणी दरातही वाढ करण्यात आली असून इतर तपासण्या आणि औषधोपचारासाठी तसेच सर्जरीसाठीचे दरही वाढविण्यात आले आहे. 

जनजनी सुरक्षा योजनेअंतर्गत सर्वच शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयांत यापूर्वी प्रसूती, सिझेरियनासाठी 440 रुपये प्रेगन्सी सोनोग्राफीसाठी 120 रुपये इतके दर आकारण्यात येणार आहेत. पूर्वी गरोदर माता प्रसूती आणि जन्मजात शिशूंना रक्तपुरवठा मोफत होत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता गरोदर महिलांना मिळणार्‍या मोफत सुविधा, प्रसूती आणि रक्तासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी शुल्क आकारणी सुरू झाली असली, तरी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मात्र ही सुविधा मोफत सुरू आहे.