Tue, Mar 26, 2019 11:52होमपेज › Kolhapur › सीपीआर परिसरात पिचकारी मारणार्‍यांना दंड

सीपीआर परिसरात पिचकारी मारणार्‍यांना दंड

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 09 2018 11:44PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा  गुन्हा आहे, हे माहीत असूनही अनेकजण बिनधास्तपणे कोठेही, कधीही तंबाखू, गुटखा, मावा खाऊन थुंकतात. यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे. अगदी रुग्णांची काळजी घेणार्‍या रुग्णालय परिसरातही थुंकणार्‍या लोकांचा प्रचंड त्रास आहे. हे चित्र बदलण्यासाठी सीपीआर प्रशासनाने कंबर कसली आहे.रुग्णालय परिसरात थुंकणार्‍यांना आर्थिक दंड करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पावती पुस्तकांची छपाई केली आहे. 

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने तंबाखूमुक्त आरोग्य संस्था अभियानासाठी कंबर कसली आहे. आरोग्य संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास  आणि विक्रीसही बंदी घातली आहे. रुग्णालय आवारात असे पदार्थ बाळगल्यास, सेवन केल्यास किंवा थुंकल्यास संबंधित व्यक्तीवर तंबाखू नियंत्रण कायदा 2003 अन्वे 200 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्यासाठी सीपीआरने पावती पुस्तकेदेखील छापून घेतली आहेत. रुग्णालय परिसरात जनजागृतीसाठी प्रबोधनपर फलक आणि जाहिराती लावण्यात आल्या आहेत. 

गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्वच्छतेचा जागर सुरू आहे.स्वच्छ सुंदर गाव आणि शहरासाठी शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन गैरविण्यात येते; पण आजही अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिक दुर्लक्ष करतात. स्वत:चे घर स्वच्छ ठेवतील; पण रुग्णालये, आरोग्य केंद्र, एसटी, रेल्वे आणि सार्वजनिक ठिकाणी पिचकार्‍या हमखास मारताना दिसतात.सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारल्यास आपले कोणी कांही करू शकत नाही, असा अनेकांचा समज आहे; पण सीपीआर प्रशासनाने आरोग्याच्या दृष्टीने सीपीआर परिसरात तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास दंड आकारला जाणार आहे. 

रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सीमाभागातील रुग्ण येतात. दररोज सीपीआरमध्ये 1500 च्या जवळपास बाह्यरुग्णांची नोंदणी होऊ लागली आहे. काही रुग्णांना तपासणीनंतर उपचारासाठी दाखल केले जाते. यातील अनेक रुग्ण हे विविध प्रकारच्या संसर्गाने बाधित असतात. अशा रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते; पण रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक व ये-जा करणार्‍या नागरिकांकडून थुंकले जात आहे.