बघता बघता सीपीआर लॉकडाऊन

Last Updated: Apr 07 2020 1:02AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची बातमी सीपीआरमध्ये समजताच एकच सन्नाटा पसरला. सुरक्षा रक्षकांनी सीपीआरच्या जुन्या व नवीन अपघात विभागाच्या समोरील दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप लावून दरवाजे बंद केले. ज्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात यायचे आहे. त्यांना उत्तरेकडील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारकाकडील गेट खुले ठेवले होते. मात्र, येथेही सुरक्षा रक्षकांची तुकडी तैनात ठेवली होती. 

कोल्हापुरात गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. सध्या सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या कसबा बावड्यातील एका महिलेचा स्वॅब नमुना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ही कोल्हापुरात कोरोनाचा चौथा रुग्ण आढळल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे सर्व ते उपाय योजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. 

सीपीआरमध्ये दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून संबंधित महिलेच्या स्वॅबचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यावेळी ही महिला नव्याने सुरू करण्यात आलेल्या अपघात विभागामध्ये उपचार घेत होती. येथील सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार बंद करून नागरिकांना उत्तरेकडील शाहू स्मारक भवनकडून रुग्णालयात प्रवेशाचा एकच मार्ग खुला ठेवला. शहर वाहतुक शाखेच्या पोलिस प्रशासनाने त्वरित भाऊसिंगजी रोडचा ताबा घेतला. सीपीआर चौक व करवीर तहसीलदार कार्यालय येथे बॅरिकेटस् लावून वाहतूक बंद केली. येथे जादा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर अकबर मोहल्ला येथील नागरिकांनी रस्त्यांवर रिक्षा आडव्या लावून मार्ग बंद केला.  महापालिकेच्याअतिक्रमण विभागाचे कर्मचारी कसबा बावडा येथे जाऊन मराठा कॉलनीकडे जाणारे रस्ते, बोळ बॅरिकेडस् लावून रोखले. 

खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णवाहिकेतून संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना सीपीआरच्या कोरोना कक्षात आणले. रात्री उशिरापर्यंत या रुग्णांची कोरोनाची प्राथमिक तपासणी येथे सुरू होती. त्यासाठी सीपीआर प्रशासनाने जादा  डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारी रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले.