होमपेज › Kolhapur › सीपीआरला जुलैपासून मिळणार अधिष्ठाता

सीपीआरला जुलैपासून मिळणार अधिष्ठाता

Published On: May 11 2018 1:37AM | Last Updated: May 10 2018 11:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन अधिष्ठाता 1 जुलैपासून रूजू होतील. महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून लवकरच अभ्यासक्रम सुरू होईल,  अशी माहिती वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी दिली.

डॉ. लहाणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास गुरुवारी भेट देऊन रुग्णालयाच्या सर्वच विभागांची पाहणी करून माहिती घेतली. कोल्हापूर व पुणे येथील शासकीय महाविद्यालयातील ट्रॉमा केअरमध्ये प्रत्येकी 48 जगा भराव्या लागणार आहेत. तसेच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत चतुर्थश्रेणी कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर यांची पदे रिक्‍त आहे. ही पदे त्वरित भरणे गरजेची आहेत. याबाबतची सर्व माहिती आरोग्य मंत्री यांना देऊन रुग्णांची होणारी गैरसोय दूर करू, असेही डॉ. लहाणे यांनी सांगितले. शासनामार्फत सुरू असलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोल्हापूरचे सीपीआर राज्यात पाचव्या स्थानी आहे. या विभागाने जोमाने काम करून अव्वलस्थान प्राप्त करावे, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असेही डॉ. लहाणे यांनी सांगितले. 

डॉ. लहाणे म्हणाले, सीपीआरच्या अपघात विभाग आणि बाह्यरुग्ण विभागाचे विस्तारीकरण करणे गरजेचे आहे. मोतीबिंदू शासकीय जिल्ह्यात रोडावली असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या मोठी असून त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयीसुविधा एकाच ठिकाणी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णालयात एमआरआय उपकरणाची गरज असून यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ.लहाणे यांनी सांगितले. तांत्रिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर देखील लक्ष केंद्रीत करू, असेही ते म्हणाले. 

सीपीआरमध्ये रिक्‍त असणारी कर्मचार्‍यांची पदे त्वरित भरण्याबाबत शासनकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. हपकीनमार्फत शासकीय रुग्णालयांची औषध खरेदी केली जात आहे; पण नवीन आणि जुने दर यावरून खरेदी खोळंबली आहे. त्यामुळेच औषधांची टंचाई भासत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना देखील डॉ. लहाणे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील व प्रभारी अधिष्ठाता वसंतराव देशमुख यांना केली. 

दरम्यान, डॉ. लहाणे यांना राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने निवेदन दिले.निवेदनात त्यांनी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची रिक्‍तपदे त्वरित भरा, वर्ग 4 व 3 मध्ये पदोन्‍नती करा, मंजूर 318 असून रिक्‍त 123 पदे भरा, वैद्यकीय बिले वेळेत मंजूर करा आदी मागण्या केल्या आहेत. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. शिरिश शहाणभाग, डॉ. सुदेश गंधम, डॉ. मिसाळ आदी उपस्थित होते.