Fri, Jul 19, 2019 15:54होमपेज › Kolhapur ›

सीपीआरचे शवविच्छेदनगृह होणार अद्ययावत

सीपीआरचे शवविच्छेदनगृह होणार अद्ययावत

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राज्यातील बारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना व रुग्णालयांमधील शवविच्छेदनगृहाच्या अद्ययावतीकरणासाठी शासनाकडून 53 कोटी 34 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (सीपीआर) शवविच्छेदनगृहासाठी 9.36 कोटी मंजूर झाले आहेत. शेंडा पार्क येथील जागेत हे अद्ययावत शवविच्छेदनगृह होणार आहे. 

नागपूर येथे मेयोत काही मृतदेहांचे डोळे व नाक कुरतडल्याच्या घटनेमुळे उच्च न्यायालयाने फटकारले होते. त्यानंतर शासनाने आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील शवविच्छेदनगृहे अद्ययावतीकरणाचे पाऊल उचलले आहे. उपराजधानीतील मेयोत शवविच्छेदनासाठी आलेल्या दोन मृतदेहांचे डोळे आणि नाक उंदरांनी कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यापूर्वीही अशा घटना घडल्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर न्यायालयाने डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि डॉ. प्रदीप दीक्षित यांची समिती तयार केली. या समितीने गोव्यातील अद्ययावत शवविच्छेदनगृहाचा अभ्यास करून अहवाल शासनाकडे व न्यायालयात सादर केला. 

सुनावणीदरम्यान राज्यातील शवविच्छेदनगृहाची दैना पाहून न्यायालयाने शासनाला चांगलेच फटकारले होते. शासनाने 12 वैद्यकीय महाविद्यालयांतील शवविच्छेदनगृह स्मार्ट करण्यास मंजुरी दिली आहे. यात कोल्हापूरच्या सीपीआरचा समावेश आहे. 12 वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 53 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वत्र शीतगृहे, संगणकीय नोंदी, सीसीटीव्ही कॅमेरा, प्रतीक्षालयासह इतर सुविधांची उभारणी केली जाणार आहे. 

महाविद्यालय प्रशासनाला जुन्या इमारती पाडून नव्या इमारती बांधण्यापूर्वी आराखडा, नकाशा शासकीय वास्तुशास्त्रज्ञांकडून मंजूर करायचा आहे. सोबत इतरही सर्व प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागणार आहे.

Tags : CPR Hospital Kolhapur Post mortem room,