Sun, Mar 24, 2019 23:04
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात लवकरच ‘सीएनजी’ पंप स्टेशन

कोल्हापुरात लवकरच ‘सीएनजी’ पंप स्टेशन

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:51AM
कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलच्या दराने वाहनचालक हैराण झाले असून, पेट्रोल व डिझेल इंधनाला पर्यायी इंधन म्हणून ‘सीएनजी’वर चालणारी वाहने पुढे आली आहेत. कोल्हापुरात सीएनजी गॅस स्टेशन नसल्याने या वाहनांना फारशी मागणी नव्हती; पण आता लवकरच कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. ऑईल कंपन्यांनी याबाबतचा सर्व्हे केला असून, यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. तीन वर्षांपूर्वी इंधन दरात महिन्यातून दोनवेळा बदल होत होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधन दरानुसार पेट्रोल व डिझेल दर रोज बदलण्याचा निर्णय ऑईल कंपन्यांनी घेतला. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली. संपूर्ण देशात वस्तू व सेवांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे; पण इंधनावर जीएसटी लागू नसल्याने अजूनही केंद्र व राज्य सरकार यावर वेगवेगळा कर वसूल करते. केंद्र सरकार पेट्रोलवर 19.48 तर डिझेलवर 15.33 पैसे कर लावते, तर राज्य सरकार यावर 21 टक्के व्हॅट तसेच सेस लावते. यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर 86 रुपयांवर गेले आहेत. 

केंद्र सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर देत आहे; पण यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभी करण्यास बराच कालावधी लागणार आहे. वाढत्या पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून यापूर्वीच मुंबई-पुण्यामध्ये रस्त्यावर ‘सीएनजी’वरील वाहने धावत आहेत. काही वर्षांपासून पेट्रोलऐवजी ‘एलपीजी’वर वाहने चालवली जात आहेत. 

कोल्हापूर शहरात सध्या रिक्षांमध्ये एलपीजी गॅसचा सर्वाधिक वापर होतो. यासाठी स्वतंत्र किट वाहनांमध्ये बसवावे लागते. पेट्रोलपेक्षा याचा दर कमी व अ‍ॅव्हरेजही चांगले मिळत असल्याने चार चाकी वाहनांमध्ये याचा वापर केला जातो, पण आता लवकरच कोल्हापुरात सीएनजीचे (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) पंप सुरू करण्यासाठी ऑईल कंपन्यांनी सर्व्हे सुरू केला आहे. हा गॅस किलोच्या दरात विकला जातो. सध्या त्याचा दर 46 रु. प्रतिकिलो आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये मिळणार्‍या अ‍ॅव्हरेजपेक्षा 15 ते 20 टक्के जादा अ‍ॅव्हरेज सीएनजी गॅसला मिळणार आहे. पेट्रोल व डिझेल वाहनांना यासाठी वेगळे किट बसवावे लागते. पुण्या-मुंबईत सीएनजीवर खासगी बस, टॅक्सी  तसेच चार चाकी वाहने धावतात. अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांची निर्मिती करतानाच त्यात सीएनजी किट असणारी वाहने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. 

कोल्हापुरात अशा पद्धतीचे सीएनजी पंपस्टेशन उपलब्ध नसल्याने वाहन चालक सीएनजी किट बसवत नव्हते;  पण आता वाढत्या इंधन दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांसमोर सीएनजी हा नवीन पर्याय पुढे येणार आहे. ऑईल कंपन्यांनी यासाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यात सर्व्हे केला आहे. लवकरच सध्या सुरू असणार्‍या पेट्रोल पंपामध्येच जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीनंतर सीएनजी पंप बसवले जाणार आहेत. 

जिल्ह्यात सध्या एका ऑईल कंपनीने सीएनजी पंप बसवण्यासाठी सर्व्हे केला आहे. सीएनजीवर चालणारी वाहने उपलब्ध नसली तरी वाहनांमध्ये आवश्यक ते किट बसवल्यानंतर सीएनजी गॅसवर वाहने धावू शकतात. नवीन पंप आल्यास कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील जनतेला पेट्रोल व डिझेलला पर्याय मिळणार आहे.

- गजकुमार माणगावे अध्यक्ष, पेट्रोल पंप असोसिएशन