Sat, Apr 20, 2019 16:15होमपेज › Kolhapur › इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सीईटी सराव परीक्षा

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी सीईटी सराव परीक्षा

Published On: Apr 16 2019 2:16AM | Last Updated: Apr 16 2019 1:07AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

बारावीनंतर सीईटी प्रवेश परीक्षेला कसे सामोरे जायचे? याविषयी विद्यार्थी आणि पालक यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात, यासाठी दैनिक ‘पुढारी’ आणि कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (केआयटी स्वायत्त) व पालक शिक्षक संघ, इचलकरंजी यांच्या संयुक्‍त विद्यमाने कोल्हापुरात रविवारी (दि. 21) मोफत ‘मॉक सीईटी’ सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 30 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

यावर्षी महाराष्ट्र शासन इंजिनिअरिंग, चकउएढ परीक्षा ऑनलाईन घेत आहे. याच धर्तीवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याकरिता व गैरसोय टाळण्यासाठी त्यांची परीक्षा ऑफलाईन (पेन पेपर) घेतली जाईल.

गेली पाच वर्षे केआयटीतर्फे ‘मॉक सीईटी’ सराव परीक्षेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना सीईटीला प्रवेश घेण्यासाठी आणि चांगले गुण मिळविण्यासाठी ही सराव परीक्षा खूपच उपयोगी पडते. बारावीनंतर इंजिनिअरिंगला (सीईटी) प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असते. या परीक्षेसाठी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने बसतात.

ही परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे स्वरूप काय असेल, प्रश्‍न कसे सोडवावेत याबाबत अनेक शंका असतात. त्यांच्या या शंका दूर करण्याबरोबरच त्यांचा सीईटी परीक्षेचा सराव व्हावा, परीक्षेचे स्वरूप कळावे, या उद्देशाने सीईटी सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. शासनाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या सीईटी परीक्षेच्या धर्तीवरच ही सराव परीक्षा असणार आहे.

‘मॉक सीईटी’ सराव परीक्षेसाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील 2 हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी दि. 21 रोजी एकाचवेळी जिल्ह्यातील 30 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

ही सराव परीक्षा केआयटी कॉलेज येथे ऑनलाईन व तालुकास्तरावर गडहिंग्लज, चंदगड, आजरा, गारगोटी, बिद्री, कागल, वारणानगर आणि निपाणी याठिकाणी  ऑफलाईन (पेन पेपर) घेतली जाणार आहे.
वरील उपक्रमास केआयटीचे चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन सुनील कुलकर्णी, सेक्रेटरी दीपक चौगुले व संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या परीक्षेसाठी नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. केआयटी कॉलेजवर अजूनही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परीक्षेसाठी जागा मर्यादित असून नावनोंदणीसाठी प्रा. समीर नागटिळक 9923618054, प्रा. शिवराज कदम 7588490150 या क्रमांकांशी संपर्क साधावा.