Tue, Jul 23, 2019 10:32होमपेज › Kolhapur › कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता ‘सीईटी’

कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता ‘सीईटी’

Published On: Feb 07 2018 2:23AM | Last Updated: Feb 07 2018 12:56AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

केंद्र व राज्य शासनाने कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने कृषी विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांकरिता यावर्षी सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन (सीईटी) प्रवेश देण्यात येणार आहेत. बारावी बोर्ड परीक्षेला काही दिवस शिल्‍लक राहिले असताना या निर्णयामुळे कृषी विभागामध्ये प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.  

अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांना राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये सीईटी  परीक्षेच्या गुणांवरूनच प्रवेश दिला जात होता. यावर्षीपासून मात्र कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीही सीईटी बंधनकारक करण्यात आली आहे.  सीईटीसाठी फॉर्म भरण्यासाठी दि. 25 मार्चपर्यंत मुदत असून संपूर्ण राज्यात दि. 10 मे रोजी विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.  भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पेपर बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे दुसरा पेपर गणिताचा किंवा जीवशास्त्राचा दिला तरी चालणार आहे.

सीईटी परीक्षेद्वारे प्रवेश दिल्याने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येऊन गुणवत्ता वाढेल, गैरप्रकारांना आळा बसेल, शिष्यवृत्ती मिळेल आणि शैक्षणिक कर्ज काढणे सुलभ होईल तसेच कृषी विद्यापीठांना मानांकन मिळण्यासाठी सीईटी उपयुक्‍त ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात दि. 18 जानेवारी 2018 पासून झाली असून, अंतिम तारीख 25 मार्चपर्यंत आहे. यंदापासून बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची पदवी प्रवेश प्रक्रियेची सीईटी ही तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवली जाणार आहे. जमिनीचा सात-बारा उतारा असल्यास 12 टक्के व कृषीचा व्होकेशनल विषय असल्यास 10 टक्के गुणही धरले जाणार आहेत व इतर प्रचलित अधिभार मिळणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना आपोआप प्राधान्य मिळणार आहे.

बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरेपर्यंत कृषी पदवी अभ्यासक्रमाला सीईटी परीक्षा घेतली जाणार असल्याची कल्पना नसलेल्या विद्यार्थ्यांचा या परीक्षेचा अभ्यास थोड्या कालावधीमध्ये कसा होणार, असा सवाल विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे.