Thu, Jul 18, 2019 08:08होमपेज › Kolhapur › प्रसंगी घरदार, कारखाने विकून एफआरपी द्यावी लागेल : चंद्रकांत पाटील

प्रसंगी घरदार, कारखाने विकून एफआरपी द्यावी लागेल : चंद्रकांत पाटील

Published On: May 27 2018 12:45AM | Last Updated: May 27 2018 12:45AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

प्रसंगी घरदार आणि कारखाने विकून संचालक आणि पदाधिकार्‍यांना उसाची एफआरपी द्यावीच लागेल, असा इशारा महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. भूविकास बँकेसह 22 महामंडळांच्या कर्जमाफीबाबतही सरकार सकारात्मक असून, लवकरच हा प्रश्‍न सुटेल, असे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारने चार वर्षांत दोनदा एफआरपी वाढविली आहे. सध्या साखरेच्या दर घसरणीमुळे एफआरपी देता येत नसल्याचे कारखानदार सांगत आहेत. साखरेच्या दरात सुधारणा होईल, तसेच साखर दर प्रतिकिलो 45 रुपयांपेक्षा खाली येणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तोपर्यंत कारखानदारांना एफआरपी अडवून ठेवता येणार नाही. कायद्याने एफआरपी देणे बंधनकारक आहे. जर संचालक आणि पदाधिकार्‍यांनी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना दिली नाही, तर त्यांच्यावर फौजदारीसह गंभीर कारवाई होईल, असा इशारा ना. पाटील यांनी दिला. उसापासून इथेनॉल बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता उसाला दर चांगला मिळेल, असे ना. पाटील यांनी सांगितले.

कारखान्यांनाही वार्‍यावर सोडता येणार नाही, असे सांगून पाटील म्हणाले की, सरकारने कारखानदारांनाही वेळोवेळी मदत केली आहे. सध्या साखरेचे दर पडल्याने आर्थिक समस्या निर्माण झाली असेल; पण ती लवकरच सुटेल.

शेतकर्‍यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली असून, दुसर्‍या टप्प्यात भूविकास बँकेसह 22 महामंडळांसाठी कर्जमाफीचा सरकार सकारात्मक विचार करीत आहे. लवकरच त्याबाबत तोडगा निघेल आणि ज्याप्रमाणे शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला त्याप्रमाणे भूविकास बँकेसह महामंडळांची कर्जे माफ होतील. त्यामुळे भूविकास बँकेच्या कर्मचार्‍यांचाही प्रश्‍न सुटेल, असे ना. पाटील यांनी सांगितले.