Mon, Aug 19, 2019 09:15होमपेज › Kolhapur › त्रुटी दूर करून योजना तळागाळापर्यंत पोहोचवा : सदाभाऊ खोत 

त्रुटी दूर करून योजना तळागाळापर्यंत पोहोचवा : सदाभाऊ खोत 

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 20 2018 12:16AMहातकणंगले :  प्रतिनिधी

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात प्रशासकीय पातळीवर काही त्रुटी निश्‍चितच आहेत. मात्र, त्या त्रुटी दूर करून सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास शासनाच्या सर्वच योजना तळागाळापर्यंत पोहोचतील, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  केले.

हातकणंगले येथे विविध शासकीय कार्यालयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी समीर शिंगटे होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाज पद्धतीबाबत  गार्‍हाणी मांडली. अधिकार्‍यांनी सर्व काही आलबेल असल्याचा दिखावा करत मंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री खोत यांनी दम भरत कामकाजात सुधारणा करून 10 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले. 

तालुक्यातील पंचायत समिती,  कृषी, पाणीपुरवठा, आरोग्य, संजय गांधी, पुरवठा विभाग आदी कार्यालयातील कामकाजाचा आढावा मंत्री खोत यांनी घेतला. आरोग्य विभागाने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करून लाभार्थींची निवड करावी, पाणीपुरवठा योजनेपासून वंचित असलेल्या उर्वरित गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करावा अशा सूचना त्यांनी केल्या. कर्जमाफीतील त्रूटी दूर करून अपात्र शेतकर्‍यांनाही लाभ देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. पंचवीस-पंधरा योजनेतून तालुक्यातील गावाना 65 लाख रुपये मंजूर केल्याचे खोत यांनी स्पष्ट केले. 

यावेळी तहसीलदार वैशाली राजमाने, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, जि. प. सदस्य राहुल आवाडे, प्रसाद खोबरे, प्रवीण यादव, सभापती रेश्मा सनदी, पं.स. सदस्य व सरपंच उपस्थित होते. कृषी अधिकारी व्ही.व्ही. देवकर यांनी आभार मानले.

खासदारकीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 

लोकसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी छेडले असता, मी लढवय्या कार्यकर्ता आहे. राजकारण आणि कुस्तीच्या मैदानात सदैव तत्पर असावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील जो आदेश देतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.