होमपेज › Kolhapur › नाले-ओढ्यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीला द्या : पालकमंत्री

नाले-ओढ्यांचे पाणी प्रक्रिया करून शेतीला द्या : पालकमंत्री

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषण करणार्‍या ओढ्या-नाल्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती व झाडांना वापरावे. यासाठी लागेल तो निधी मी देईन. यासाठी जे करता येईल, ते तत्काळ आ. अमल महाडिक यांनी करावे, यासाठी मी पाठीशी असल्याचे प्रतिपादन  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी शेंडा पार्क येथे वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी केले. यामुळे नदीचे प्रदूषण बंद होईल. ही प्रक्रिया या आठवडाभरात सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा नदी प्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतात. जर नाले व ओढ्यांतील सांडपाणीच नदीत मिसळण्याचे बंद केले, तर ही समस्या सुटेल. याशिवाय, या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेती व वृक्षांना द्यावे. यामुळे शेती व झाडांना लागणार्‍या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. या प्रकल्प उभारणीस जे काही लागेल, त्यासाठी मी मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांना घेऊन आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू करावी, अशी सूचना यावेळी आ. महाडिक यांना त्यांनी केली.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदींसह अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.