Fri, Nov 16, 2018 13:12होमपेज › Kolhapur › चला जाऊ फुलपाखरांच्या गावा!

चला जाऊ फुलपाखरांच्या गावा!

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:58PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

हे आंब्याचे झाड... हा गुलमोहर... असं आपण झाडांवर दिसणारी फळं-फुलं  पाहून सहज म्हणतो... पण आता झाडांवर  रंगीबेरंगी फुलपाखरं लगडलेलं स्वर्गीय द‍ृश्य अनुभवयाला मिळणार आहे. इवल्याशा मखमली पंखांच्या फुलपाखरांच्या मिणमिणत्या हालचाली पाहून आपलं देहभान हरपणार आहे. देशच नव्हे, तर विदेशातूनही पर्यटक मग ही फुलपाखरांची झाडं पाहायला येतील. कारण, आता राधानगरीमध्ये वनक्षेत्रात फुलपाखरांचे उद्यान  साकारले जात आहे. हे उद्यान जागतिक पर्यटस्थळावर यानिमित्ताने दिमाखात झळकणार आहे. 

राधानगरी जंगल परिसर ही निसर्गसंपदेची खाण आहे. या ठिकाणी जैवविविधता खच्चून भरली आहे. वाघ, बिबटे, अस्वल, गवा आदी वन्यप्राणी आहेतच; पण फक्‍त राधानगरी परिसरातच आढळणार्‍या दुर्मीळ पक्ष्यांच्या प्रजातीसाठीही हा परिसर जगविख्यात आहे. पश्‍चिम घाटमाथ्याचा हा वैभवसंपन्‍न डोंगरमाथा आता फुलपाखरांच्या उद्यानामुळे आणखी श्रीमंत होणार आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मोरमॉन, आकाराने सर्वात मोठे असणारे सदन बर्डविंग ही फुलपाखरं इथं मोठ्या प्रमाणात आढळतात. यासह असंख्य स्थानिक प्रजातींचा हा परिसर अधिवास आहे. जैव अभ्यासक, बच्चे कंपनीला अन्‍नसाखळी दर्शनासाठी हा वेगळा अनुभव असेल. एकाच ठिकाणी शेकडो प्रजातींची लाखो फुलपाखरं पाहण्याची संधी कुटुंबसहलींना या निमित्ताने मिळणार आहे. 

 ...असा असेल प्रकल्प

राधानगरीतील वन वसाहत परिसरातील अर्धा एकर जागेत हे उद्यान साकारले जाईल. फुलपाखरांना आकर्षित करणारी झाडे या ठिकाणी लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या या परिसरात स्थानिक पंचवीस फुलपाखरांच्या प्रजाती आहेत; पण देशोदेशींच्या किमान 150 प्रजातींचा अधिवास इथे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

फुलपाखरांची मराठी नावं

हळदी कुंकू, गुलाबी राणी, चित्ता, ढाण्या कडवा, नकाशा, वैरिणी, उर्वशी, गौरांग, खेडूत, पाकळी, छोटा चांदवा, शनी पाकोळी, राणी पाकोळी, चंचल, पाच पंखी, नायक आदी, तर   बँडेड पीकॉक, मलबार बँडेड पीकॉक या प्रजाती जगात फक्‍त इथंच आढळतात.