Fri, Aug 23, 2019 21:34होमपेज › Kolhapur › बफर स्टॉकमधील साखरेवर शंभर टक्के कर्ज

बफर स्टॉकमधील साखरेवर शंभर टक्के कर्ज

Published On: Jul 11 2018 1:48AM | Last Updated: Jul 11 2018 1:41AMकोल्हापूर : निवास चौगले

साखर कारखान्यांकडील बफर स्टॉकमधील साखरेला बँकांकडून शंभर टक्के कर्जपुरवठा मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेनेच 2007 च्या या निर्णयाची अंमलबजावणी यावर्षी करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत. या निर्णयाने कारखान्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्र सरकारने देशभरात 30 लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचे आदेश दिले आहेत. कारखानानिहाय हा कोटाही निश्‍चित करण्यात आला आहे. बफर स्टॉकवरील साखरेवर सरकारची मालकी असणार आहे, एक वर्षासाठी हा साठा राहणार आहे. या साखरेवरील व्याज, गोदाम भाडे व विम्याची रक्‍कम सरकार देणार आहे. 

सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्‍विंटल 2,900 रुपये निश्‍चित केला आहे; पण राज्य बँकेकडून हेच मूल्यांकन गृहीत धरून त्यावर 90 टक्के उचल कारखान्यांना दिली जाते. त्यातून उसाची एफआरपी देण्यासाठी केवळ प्रतिक्‍विंटल 1,860 रुपयेच मिळतात. मिळणार्‍या पैशांतून कारखान्यांना एफआरपी देणे शक्य न झाल्याने बहुतांशी कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत. आज देशांतर्गत साखरेचे दर प्रतिक्‍विंटल 3,180 ते 3,200 रुपये आहेत. त्यामुळे राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन वाढवावे, अशी उद्योगाची मागणी आहे. 1 जूननंतर राज्य बँकेने मूल्यांकन वाढवले नाही; पण एप्रिल 2018 मध्ये साखरेचे दर उतरल्याने किमान चारवेळा मूल्यांकनात प्रत्येकवेळी प्रतिटन 100 ते 150 रुपयांची कपात केली. 2007 मध्ये रिझर्व्ह बँकेनेच सर्व बँकांना साखर मूल्यांकनाच्या शंभर टक्के कर्ज बफर स्टॉकमधील साखरेवर देण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणीही झाली, त्याप्रमाणे कारखान्यांना पैसे मिळाले. आता बफर स्टॉक निश्‍चित होऊन पंधरा दिवस होत आले, त्यामुळे पुन्हा बँकांनी 2007 च्या आदेशाची अंमलबजावणी करावी, यासाठी साखर संघाचे प्रयत्न होते. त्यानुसार आज रिझर्व्ह बँकेने साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करणार्‍या बँकांना बफर स्टॉकमधील साखरेला शंभर टक्के कर्ज देण्याचे आदेश दिले.