Thu, Apr 25, 2019 21:32होमपेज › Kolhapur › शिक्षण विभागामधील लाचखोरी चव्हाट्यावर

शिक्षण विभागामधील लाचखोरी चव्हाट्यावर

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:05AMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांमध्ये चालणारी लाचखोरी आणि दलाली शाहूवाडी पंचायत समितीमध्ये घडलेल्या प्रकरणावरून चव्हाट्यावर आली आहे. शिक्षण विभागात अधिकारी म्हणून येण्यापूर्वी प्रत्येकांनी किमान काही वर्ष शिक्षक म्हणून काम करण्याची अट आहे. असे असताना आपल्याच सहकार्‍याकडून अधिकारी झाल्यानंतर सुरू होणारी लूट यानिमित्ताने जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय बनला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला एक वेगळी परंपरा आहे. लोकसहभागातून संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेने राजर्षी छत्रपती शाहूरायांच्या नावाने एक अभियान सुरू करून एक शिक्षण चळवळ उभारली होती. या अभियानात अनेक शाळांचे केवळ बाहेरचे रूप पालटले नाही, तर शिक्षणाचा दर्जादेखील सुधारण्यास मदत झाली. हे गेल्या काही वर्षांतील शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या निकालावरून दिसून येत आहे. या अभियानाची नंतर राज्यपातळीवर दखल घेण्यात आली आणि हे अभियान राज्यभर लागू करण्यात आले. अशी परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला मात्र गेल्या काही वर्षांपासून लागलेले लाचखोरीचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. एक वर्षापूर्वीच नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर नवीन नोटा बाजारात येण्यापूर्वी या नोटा घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील एकाला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याची चर्चा थांबते न थांबते तोच दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील महिला शिक्षण अधिकार्‍याला लाच घेताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे ही लाच तालुक्याच्या ठिकाणी घेताना पकडल्यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरी मुख्यालयापासून ते ग्रामीण पातळीपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.

बदल्यांचा काळ आला की, काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांना, काही पदाधिकार्‍यांना सुगीचे दिवस वाटतात. काही तालुक्यांतील काही शिक्षक तर बदल्यांमध्ये दलालीच करत असल्याचे बोलले जाते. यामध्ये केवळ घेणार्‍यांना दोष देऊन चालणार नाही तर मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते शिक्षकच बदलीसाठी पैसे मोजण्यास तयार असल्याने ते देखील तितकेच जबाबदार आहेत. 

विशेषत: जिल्ह्याबाहेर बदली होणार्‍या शिक्षकांना वरपासून खालीपर्यंत हात ओले केल्याशिवाय त्यांची सुटकाच होत नसल्याचे चित्र यानिमित्ताने नागरिकांसमोर आले आहे. 

प्रत्येक ठिकाणी शिक्षकाची अडवणूक

चारशे, पाचशे किलो मीटर अंतरावरून आपल्या जिल्ह्यात आल्याचा आनंद त्या शिक्षकाच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद असतो. त्या आनंदातच तो जिल्हा परिषदेत येतो. जिल्हा परिषदेत आल्यानंतर मात्र त्याच्या चेहर्‍यावरील सर्व आनंद मावळतो. सुरुवातीलाच त्याला जिल्ह्याच्या शेवटची टोकाची शाळा दाखविली जातो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात येण्याची चूक केली की काय, असे त्याला वाटू लागते. यातूनच मग अर्थपूर्ण चर्चेला सुरुवात होते. कोल्हापूर सोडून बाहेर जाणार्‍या शिक्षकाचीही अशीच अवस्था असते. कारण बदली झाल्यानंतर त्याला कार्यमुक्‍तीचा आदेश लागतो. हा आदेश सहजासहजी दिला जात नाही. याशिवाय सेवा पुस्तक, ना देय प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हा शिक्षक जिल्हा सोडू शकत नाही. यासाठी शिक्षकांची अडवडणूक होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. मात्र, कोणी कोणाकडे लक्ष द्यायचे हा प्रश्‍न आहे. या प्रत्येक ठिकाणी शिक्षकाची अडवणूक होत असते, पण तो काही करू शकत नाही. त्यातूनच असे प्रकार घडत असल्याने शिक्षण विभागाच्या बदनामीला सामोरे जावे लागत आहे.