Fri, Jul 19, 2019 15:47होमपेज › Kolhapur › लाचखोरांना ना भय... ना लज्जा!

लाचखोरांना ना भय... ना लज्जा!

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:53PMसुळकूड : वार्ताहर

जिल्हाधिकारी कार्यालयातील  उपचिटणीसालाच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे जिल्ह्यात भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रूजून घट्ट झाली आहेत, हे समोर आले आहे. दस्तुरखुद्द महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हे प्रकरण घडल्यामुळे, भ्रष्टाचारी अधिकारी किती निर्भय व बेमुर्वत बनले आहेत व त्यांनी नागरिकांचा कसा आर्थिक छळवाद मांडला आहे, याचे हे ठळक उदाहरण असल्याची चर्चा होत आहे.

जिल्ह्याला, राज्याला किंबहुना देशाला सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी झटणार्‍या खेळाडूकडूनही परवान्यासाठी लाच मागितली गेल्याचे समोर आले आहे. असे अधिकारी स्वत:चे खिसे भरण्यासाठी, कसलाही विधिनिषेध वा खंत बाळगत नसल्याचेच यावरून अधोरेखित होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असे होत असेल तर विभागीय आणि तालुका पातळीवरील शासकीय व निमशासकीय कार्यालयांतून नागरिकांना आपली नियमित कामे करून घेण्यासाठी; विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांना स्वत: कष्टाने मिळविलेले पैसे अशा लाचखोर अधिकार्‍यांच्या घशात घालताना किती मनस्ताप व यातना होत असतील? यासंबंधी राज्यकर्त्यांनी व संबंधित खात्यातील वरिष्ठांनी दखल घेऊन कार्यवाही करणे आवश्यक बनले आहे.

नागरिकांचे नियमित काम असले, तरी त्यात त्रुटी काढावयाच्या, त्रुटींची पूर्तता केली, तरी पुनश्‍च त्रुटी काढून त्यांना कार्यालयास हेलपाटे मारावयास लावावयाचे, जेणेकरून थकून तो कामाच्या पूर्ततेसाठी आपल्याकडे स्वत: किंवा एजंटामार्फत आर्थिक तडजोडीसाठी यावा, अशी व्यूहरचना लाचखोर अधिकार्‍यांकडून अवलंबली जाते. कामाची निकड व कामानुसार लाच रकमेचे दरही ठरलेलेच असतात. फक्त आपल्या गरजेनुसार रकमेत थोडा कमी-जास्त फेरफार करावयाचा व विनाबोभाट डल्ला मारावयाचा, अशी सामान्यपणे पद्धत सर्वत्र रूढच झाली आहे.

लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात पोलिस, क्लार्क, लघुटंकलेखक, दुय्यम दर्जाचे अधिकारी अडकत असले, तरी त्यांची अधिकार मर्यादा विचारात घेता त्यांना 10-20 हजारांची लाच कोणी देणे शक्य नाही. तर ते लाचखोरीच्या पाण्यातील केवळ छोटे मासेच असतात. मोठे मासे गळास लागल्याचे प्रकार कमीच असतात. त्यामुळे लाचखोरीतील बहुतांश प्रकरणांत कनिष्ठ कर्मचारी दोषी ठरून नोकरीस मुकतो व त्याचा संसार उद्ध्वस्त होतो; पण लाचेतील मोठा हिस्सा फस्त करून वरिष्ठ मात्र नामानिराळे राहतात व आपल्या आहे त्या खुर्चीत विराजमान असतात. यावरून लाच घेण्याची सिस्टिम आणि त्यातून होणारी लाचेची वाटणी किती व्यवस्थित आहे, हे स्पष्ट होते.