Sun, Aug 25, 2019 04:27होमपेज › Kolhapur › स्तनपान एक अमूल्य देणगी (Video)

स्तनपान एक अमूल्य देणगी(Video)

Published On: Aug 01 2018 1:24AM | Last Updated: Aug 01 2018 5:35PMकेल्हापूर : पूनम देशमुख

आईचे दूध अर्थात स्तनपान हा बाळासाठी निसर्गदत्त असा आदर्श आहार आहे. परमोच्च आनंदापैकी एक असलेल्या मातृत्वाचा आनंद आणि त्याचा यथार्थ अनुभव बाळाला सर्वप्रथम स्तनपान दिल्याने मिळतो. आईचे दूध बाळासाठी अमृतच असते. बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्याचे होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढले पाहिजे, तरच त्याची योग्य वाढ होऊ शकते. मात्र, स्तनपानाविषयी समजात चुकीच्या रूढी - परंपरा, गैरसमजुतीमुळे बालकांना योग्य आहार मिळत नाही. या समजुती दूर केल्यास बालकांच्या आरोग्यात मोठा बदल घडू शकतो. 

बर्‍याचदा ग्रामीण भागातील ‘आई’ आरोग्याच्या तक्रारीमुळे  तर शहरातील ‘मम्मी ’हेल्थ कॉन्शिअसमुळे स्तनपान देणं टाळतात. याशिवाय सिझेरियन झालेल्या अनेक मातांमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांत दूध येत नाही. तर काही माता कुपोषित असतात, त्यांना अन्य कारणास्तव स्तनपान देणं शक्य होत नाही. त्यामुळे अर्भकाचं कुपोषण होते. आजच्या घडीला स्तनपानाची जागा दुधाची पावडर, बाटली आणि बालान्नाने (बेबी फूड) ने घेतली आहे. आईचे दूध आणि घरी बनवलेल्या ताज्या अन्नपदार्थांपेक्षा बंद डब्यातील महागडे बालान्न अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायक असल्याचा प्रचार जाहिरातीद्वारे केला जातो. या कंपनी प्रोडक्ट वापरण्याची योग्य पद्धत माहिती नसल्याने पोषणदोष उद्भवतो. याचा परिणाम मुलांचा विकास आणि वाढीवर होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

 मातेच्या दुधातून आईला आहार आणि प्रेम दोन्ही मिळते, मातेच हेच दूध बाळासाठी योग्य पोषण आहे. बाळाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे खर्‍या अर्थाने सुवर्णकाळ असतो. याच काळात मेंदूचा अधिकतम विकास आणि पोषण होते. तसेच कुपोषण व  त्यासम व्याधींना थोपवता येणं शक्य होते. महापालिकेच्या आकडेवारीवरून 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च  2018 अखेर 24,032 बालमृत्यू झाले असून यात ग्र्रामीण भागात 10,169 तसेच शहरी भागात 13,863 इतके बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

मिल्क बँक गरजेची
काही कारणास्तव आई अंगावर बाळाला पाजू शकत नाही, पूर्वी ओल्या दायीचा त्याला पर्याय होता. मात्र, हा पर्याय व्यवहार्य नसल्याने ह्यूमन मिल्क बँकचा म्हणजे मातृदुग्ध पेढीची संकल्पना राबवली जात आहेेे. जिल्ह्यात अद्याप अशी मिल्क बँक अस्तित्वात नसली तरी मेेट्रोे सिटीमध्ये मिल्क बँक काळाची गरज लक्षात घेऊन सुरू होत आहेत. आईच्या दुधाला वंचित राहिलेल्या बाळाला वरचे दूध म्हणून गायी- म्हशीचे दुध दिले जाते. मात्र, आईच्या दुधात असणारी संरक्षक द्रव्ये या दुधात नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही अत्यल्प प्रमाणात असतात. बाळंतपणानंतर काही वेळेस आईच्या शरीरात बाळाच्या गरजेेपेक्षा जास्त दूध तयार होते. अशा वेळेस ते दूध फेकून न देता त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या दुधाचा उपयोग अपुर्‍या दिवसाच्या बाळासाठी होतो. या मिल्क बँकेतील दूध आईच्या दुधाइतके सुरक्षित असते. निरोगी प्रकृती असणार्‍या स्त्रीच्या दुधाची साठवण इतर बाळांसाठी केली जाते. हे दूध शास्त्रोक्त पद्धतीने साठवले जाते. मिल्क बँकेमध्ये साधारण सहा महिन्यांपर्यंत हे दूध राहू शकते.