Sun, Jun 16, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीला ‘ब्रेक’

जिल्ह्यातील कर्जमाफीच्या यादीला ‘ब्रेक’

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:46AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राधानगरी-भुदरगडचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांना कर्जमाफी झाल्याने विधानसभेत व सभागृहाबाहेर याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. आ. आबीटकर यांनी कर्जमाफीचा अर्ज न भरताच त्यांना कर्जमाफी दिल्याने या चुकीचे खापर सहकार खाते, आय.टी. विभागासह जिल्हा बँकेवर फोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील यादीत पुन्हा काही चुका होऊ नयेत म्हणून शासनाने 78 हजार 932 शेतकर्‍यांच्या कर्जमाफीलाच ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाने दोन दिवसांपूर्वीच 78 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची यादी जाहीर केली. या शेतकर्‍यांना 132 कोटी रुपये देण्यात येणार होते. दरम्यानच्या काळात आ. आबीटकर यांना कर्जमाफी दिल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज न भरताही त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. ही माहिती आ. आबीटकर यांना संस्थेतून सांगण्यात आल्यानंतर याचे पडसाद विधानसभेत उमटले. आ. आबीटकर यांच्याप्रमाणेच आणखी 10 खाती अपात्र असताना त्यांना कर्जमाफीची रक्कम आल्याने गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यातील कर्जमाफीचा गोंधळ आणखी वाढू नये म्हणून शासनाने 78 हजार शेतकर्‍यांची यादीच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

आ. आबीटकर यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने जिल्हा बँकेला दोषी धरले आहे. बँकेने चुकीची माहिती भरल्यानेच हा प्रकार घडल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. मात्र, सरकारकडून विधानसभेत जी माहिती देण्यात आली ती चुकीची असल्याचे जिल्हा बँकेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. संस्थेने तयार केलेली माहिती लेखापरीक्षण विभागाने तपासली आहे. तसेच तालुकास्तरीय समितीने त्याची छाननी करणे अपेक्षित होते. जिल्हा बँकेने ही माहिती फक्त अपलोड करण्याचे काम केले आहे. यात बँकेची कोणतीही चूक नसल्याचे म्हटले आहे. सध्या जरी शासनाने 78 हजार शेतकर्‍यांची यादी थांबवली असली, तरी यापूर्वी 80 हजार शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जमाफीचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.