Thu, Apr 25, 2019 06:02होमपेज › Kolhapur › शाखाधिकारी, कॅशियरला अटक

शाखाधिकारी, कॅशियरला अटक

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा बावडा शाखेचा निलंबित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (वय 56, रा. शिये, ता. करवीर) आणि  कॅशियर परशुराम कल्लाप्पा नाईक (वय 48, रा. कसबा बावडा) या दोघांना  गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. बनावट सोने प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला असून गुन्ह्यातील दोघांना अटक आहे. या प्रकरणातील बँकेच्या पॅनेलवरील सराफ सन्मुख ढेरे अद्याप पसार आहेत.

अटकेची कारवाई टाळण्यासाठी संशयित संभाजी पाटीलसह तिघेही पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पथकांनी सहा, सात ठिकाणी छापे टाकले. मात्र, ते सापडले नव्हते. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी सकाळी तपासाधिकारी संजय मोरे यांच्याकडून आढावा घेतला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली होती. 

बनावट सोने फसवणूकप्रकरणी आणखी काही संशयितांची नावे पुढे येत आहेत. त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यात येत आहेत. चौकशीत दोषी ठरणार्‍यांची गय केली जाणार नाही.संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मोहिते यांनी सांगितले.

सराफावरील अतिविश्‍वास नडला

जिल्हा बँकेच्या कसबा बावडा शाखेतील बनावट सोने प्रकरणात अधिकार्‍यांनी सराफावर ठेवलेला अतिविश्‍वासच त्यांना नडला आहे. जे काम बँकेच्या या अधिका़र्‍यांनी करायचे, तेच काम हा सराफ करत होता. त्यामुळेच सराफावरील संशय बळावला आहे. त्याला बँकेतील कोणी सहकार्य केले हे तपासत उघडकीस येईलच; पण अधिकार्‍यांना मात्र त्यांनी केलेले दुर्लक्ष भोवणार आहे. 

सोने तारणावर कर्ज देणार्‍या इतर बँकांत पॅनेलवरील सराफाला बँकेत प्रवेश नाही. बँकेतील शिपाई कर्जदाराला घेऊन सराफांकडे जातो, त्याठिकाणी मूल्यांकन वजन व किती कर्ज देता येईल याचा अर्ज फक्‍त सराफ भरून देऊन त्यावर सही करतो. त्यानंतर बँकेकडून पैसे देण्यासह त्या कर्जदाराचे तारण सोने पिशवीत घालून ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम अधिकारी करतात. नेमका याच्या उलटा व्यवहार या बँकेत सुरू होता. 

कसबा बावडा शाखेतून 27 प्रकरणांतील 32 लाख रुपये किमतीचे खरे सोने हडप झाल्यानंतर सोने तारण कर्ज प्रकरणातील अनेक चुकीचे प्रकारही चौकशीत पुढे आले. मार्च 2018 मध्ये तारण ठेवलेले सोने बनावट निघाल्यानंतर कारवाईच्या भीतीने संबंधित कर्जदाराला त्याने ठेवलेले सोने विकत घेऊन दिल्याचा प्रकार घडला. त्यानंतर एका कर्जदाराने सोने तारणावरील पैसे भरून सोने नेले. पुन्हा तोच कर्जदार सोने तारणासाठी आला असता त्याला आपल्या नावावर थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित कर्जदाराने पैसे भरलेली पावती दाखवल्यानंतर मात्र शाखाधिकारी व कॅशियर यांनी नजरचुकीने पैसे भरलेली एंट्री राहून गेल्याचा खुलासा करून यावर पडदा टाकला. फुलेवाडी शाखेतील अशाच एका प्रकरणातील सोने तारण या शाखेत केले, त्याची माहिती सराफाला ही नाही. असे अनेक प्रकार घडत असताना बँक निरीक्षक, तपासणी अधिकारी या शाखेच्या बाबतीत काय करत होते, हा प्रश्‍न उपस्थित होतो.