Thu, Jul 18, 2019 14:23होमपेज › Kolhapur › पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 11:43PMकोल्हापूर : प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन पाठ्यपुस्तके पडणार आहेत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद, शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना विषयनिहाय सुमारे 17 लाख 56 हजार 459 मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर 15 जूनला शाळा सुरू होणार आहेत. कोणताही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये, मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके  योजना सुरू केली आहे. विभागीय पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तकांची वाहतूक निश्‍चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडारातून पाठ्यपुस्तके पुरवठ्यास सुरुवात झाली आहे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून यासंदर्भात नियोजन केले आहे. कोणत्या शाळेत किती पुस्तके लागतील याची यादी केली आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीच्या 1994 शाळा असून, यात 1 लाख 73 हजार 971 विद्यार्थी शिक्षण घेतात. शहरी व ग्रामीण मिळून खासगी अनुदानितच्या सुमारे 631 शाळा आहेत. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख 84 हजार 402 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. शिक्षण विभागाकडून तालुकानिहाय पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू आहे. ही पाठ्यपुस्तके त्यानंतर केंद्रावर पाठविली जातील. पाठ्यपुस्तके वाटपाचे आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे कार्यक्रम अधिकारी एस. बी. कदम यांनी सांगितले.