Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Kolhapur › प्रवाशांचे बुकिंग; विमानसेवा मात्र हवेतच

प्रवाशांचे बुकिंग; विमानसेवा मात्र हवेतच

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 29 2018 12:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा बंद केलेली नाही, तर तांत्रिक कारणास्तव फ्लाईट रद्द करण्यात आल्याच्या भूमिकेवर कंपनी अद्याप ठाम आहे. 30 जुलैपर्यंत प्रवाशांचे बुकिंग असल्याचेही सांगण्यात येते. प्रवाशांनी बुकिंग केले असले तरी विमानसेवा हवेतच आहे. यामुळे विमानसेवा बंद झाल्याबाबतचा संभ्रम आजही कायम होता. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील दर रविवार, मंगळवार आणि बुधवारी असणारी सेवा या आठवड्यात बंद झाली. या तीनही दिवसांच्या फेर्‍या रद्द झाल्याने, कंपनीने सेवाच बंद केल्याची चर्चा आहे. कर्मचार्‍यांचा पगार थकल्याने कंपनीचे ‘उडाण’ जमिनीवरच राहिल्याचे सांगण्यात येत आहे. फ्लाईट रद्द झाल्या असल्या, तरी सेवा बंद केलेली नाही, या भूमिकेवर कंपनी अजूनही कायम आहे. विमानतळ प्राधिकरणानेही याबाबत कोणतीच माहिती आजही प्राप्त झाली नसल्याचे सांगितल्याने येत्या रविवार, मंगळवार व बुधवारी बुकिंग केलेल्या प्रवाशांत गोंधळाचे वातावरण आहे.दरम्यान, या कंपनीऐवजी अन्य कंपनीला विमानसेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, याची तातडीने कार्यवाही होण्याकरिता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार येत्या तीन-चार दिवसांत याबाबत दिल्लीत तातडीची बैठक होण्याची शक्यता आहे. या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाका, अशी मागणीही करण्यात आली आहे, त्याला नाशिक, जळगाव येथील खासदारांनीही पाठिंबा दिला आहे.