Fri, Apr 19, 2019 08:29होमपेज › Kolhapur › ब्‍लॉग : ‘स्वाभिमान’ गहाण; ‘रयत’ देशोधडीला

ब्‍लॉग : ‘स्वाभिमान’ गहाण; ‘रयत’ देशोधडीला

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 1:15AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आले; पण लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून दुभंगले... अशीच काहीशी परिस्थिती शेतकरी संघटनेच्या नेत्यांची झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. एकेकाळी कारखानदार आणि सरकारलाही धडकी भरवणार्‍या नेत्यांनीच एकमेकांवर चिखलफेक आणि कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केल्याने शेतकर्‍यांसाठी नव्हे, तर अस्तित्वासाठीची ही लढाई शेतकर्‍यांच्या जिव्हारी लागली आहे. केवळ राजकारणापायी ‘स्वाभिमान’ गहाण ठेवून ‘रयते’ला देशोधडीला लावण्यार्‍या या नेत्यांना आता धडा शिकविलाच पाहिजे, अशा संतप्‍त प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकरीवर्गातून उमटू लागल्या आहेत.

ऊस आणि दुधाच्या दरासाठी राजू शेट्टी यांनी रान उठविले. गेल्या दोन तपांहून अधिक काळ त्यांनी शेतकर्‍यांसाठी लढे उभारले. शेतकरी संघटना राजकारणापासून दूर राहिली पाहिजे, यासाठी वेळ येईल तेव्हा आसूड हातात घेतला. दूध दरासाठी आंदोलन करून अनेक किलोमीटरची पायपीट करून शेट्टी यांनी शेतकर्‍यांना घामाचे दाम मिळवून दिले. ऊस दरातही शेतकर्‍यांची प्रचंड फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कारखानदारांविरोधात चाबूकफोड आंदोलन करून सळो की पळो करून सोडले. काही कारखान्यांच्या सर्वसाधारण सभांवर आक्रमण करून स्वतःबरोबर शेतकर्‍यांची डोकी फुटेपर्यंत माघार घेतली नाही. पोलिसांना हाताशी धरून कारखानदारांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, तरी कधीच तहाची भाषा केली नाही. मूळच्या शेतकरी संघटनेला राजकारणाचा वास लागताच संस्थापक शरद जोशी यांच्यापासून फारकत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना सुरू केली आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण लढा दिला.

खरंच, मागे वळून पाहता शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा इतिहास आठवताच आज सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत आहेत. शेतकर्‍यांच्या हक्‍कासाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सदैव रस्त्यावर उतरणारेच आपसात लढू लागले आहेत. ‘ढवळ्यासंगं पवळ्या गेला अन् वान ना गुण लागला,’ अशी त्यांची अवस्था झाली. शेतकर्‍यांची आंदोलने आणि त्यातून शेतकर्‍यांच्या हृदय सिंहासनावर राज करणारे राजू शेट्टी जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार झाले. मूळच्या शेतकरी संघटनेचा राजकारणातील शिरकाव सहन न झाल्याने बाहेर पडल्याचे सांगणारे शेट्टी नंतर शेतकर्‍यांचे प्रश्‍न विधिमंडळात आणि संसदेत मांडण्यासाठी संघटनेचे प्रतिनिधी तेथे पोहोचलेच पाहिजेत, अशा विचारधारेपर्यंत पोहोचले...आणि तेथेच त्यांची फसगत झाल्याचे आज शेतकर्‍यांना जाणवू लागले.

कामगार असो वा शेतकरी, कोणतीही संघटनात्मक विरोधी चळवळ सत्ताधार्‍यांना नकोशी असते हे आताच नाही, तर अनेक वर्षांच्या इतिहासावरून स्पष्ट झाले आहे. शेतकरी संघटनेच्या बाबतीतही तोच इतिहास घडल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीत दिसून येते. शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी संघटनेने कांदा आणि तंबाखूच्या आंदोलनातून त्याकाळच्या सत्ताधार्‍यांची झोप उडविली होती. त्यातूनच जोशी यांना राजकारणाच्या रुळावर नकळत आणले गेले आणि संघटना फुटली. राजू शेट्टी यांच्याबाबतीत मात्र वेगळे घडले. त्यांना राजकारणाची वाट कोणी दाखविली नाही, तर ते स्वतःच निवडणुकीच्या मैदानात उतरले. सत्ताधार्‍यांविरोधात अस्त्र उगारणे हा त्यांचा स्थायी भाव असल्याने काँग्रेस सरकारकडून त्यांना अवहेलनाही सहन करावी लागली. 

शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. गावरान भाषणांतून सत्ताधार्‍यांना शिवराळ भाषेतून झोडपण्याचे काम त्यांनी केले. विशेषतः, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार हेच खोत यांचे टार्गेट असायचे, हे आजही त्यावेळी मेळाव्याला उपस्थित असणार्‍या शेतकर्‍यांना आठवते. पवारांविरोधात बोलले की टाळ्यांचा पाऊस पडतो आणि शिट्यांनी आसमंत  घुमतो हे जाणणार्‍या खोतांचा संघटनेची मुलख मैदान तोफ असा उल्लेख केला जाऊ लागला. हीच तोफ आज संघटनेकडे तोंड करून आग ओकू लागल्याने नेते आणि कार्यकर्तेही घायाळ होऊ लागलेत. त्यातूनच शेट्टी व खोत यांच्यात चिखलफेक आणि दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक सुरु झाल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

जोशी यांच्या वाटेवरून खोत

ज्याप्रमाणे जोशी यांना राजकारण आणि सत्तेची चव चाखायला लावण्यात त्यावेळच्या काँग्रेस सत्ताधार्‍यांनी यश मिळविले, तोच प्रकार आज खोत यांच्याबाबतीत झाल्याचे जुने आणि जाणकार शेतकरी बोलत आहेत.भाजप सरकार सत्तेवर येताच त्यांनी खोत यांना गळाला पकडले. राज्यमंत्रीपद दिले. अनेक वर्षे निवडणुकीच्या मैदानातून निवडून येणार्‍या शेट्टींच्या समर्थकांना ते रुचणारे नव्हते हे त्याचेवेळी स्पष्ट झाले आणि काही कारणांनी खोतांची हकालपट्टी झाली. मंत्रीपद काढून घेण्याची मागणी झाली. सरकार नमले नाही. अखेर राजकीय संघर्ष सुरु झाला. आज खोत यांच्याविरोधात शेट्टी समर्थक एकवटले. एकेकाळी शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी दगडफेक करणारे आज एकमेकांच्या अस्तित्वासाठी डोकी फोडू लागले आहेत. बांडगूळ आणि अवकातीची विशेषणे लावू लागले. शेतकर्‍यांचे प्रश्‍न बाजूला ठेवणार्‍या या नेत्यांच्याविरोधात आता शेतकरी आसूड घेतील काय असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.